इस्लामपुरात खासगी ठेकेदाराला अंत्यविधीसाठीचा ठेका ! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

मृत व्यक्तींशी संबंधित लोकांनी परस्पर व्यवस्था न करता पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

इस्लामपूर (सांगली) : पालिका हद्दीतील कोरोनामुळे मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता पालिकेने खासगी ठेकेदार नेमला आहे. शुक्रवारी अर्धवट जळालेल्या मृतदेहाची झालेली अवस्था पाहून आता या स्मशानभूमीची सर्व जबाबदारी या ठेकेदाराला देण्यात आली असून मृत व्यक्तींशी संबंधित लोकांनी परस्पर व्यवस्था न करता पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी यापूर्वी पालिकेकडून गॅस शवदाहिनीचा वापर सुरू होता; मात्र या गॅस शवदाहिनीवरील दोन कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने सध्या ही दाहिनी बंद आहे. त्याआधी एकाचवेळी एकापेक्षा जास्त मृतदेह आल्यास त्याचे अंत्यसंस्कार गॅस शवदाहिनीवर करणे अशक्‍य बनल्यामुळे लाकडावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करणे सुरू होते. आजूबाजूच्या गावांमधील काही कोरोनाबाधित व्यक्‍तींचे अंत्यसंस्कार परस्परच इस्लामपूरच्या स्मशानभूमीत झाले, संसर्गाच्या धोक्‍यामुळे चिता पूर्ण पेटण्याची वाट न बघताच शेवट केल्याने अर्धवट जळालेल्या मृतदेहांची विटंबना झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करताना येणा-या अडचणीसाठी पालिकेने 4 सप्टेंबरपासून फक्‍त कोरोनाबाधित मृत व्यक्‍तीवर दहनविधी करण्यासाठी कापुसखेड रस्ता स्मशानभूमी येथे ठेकेदार नेमला आहे. जळण, इंधन व इतर साहित्य आणणे, चिता रचणे, अग्नि देणे, रक्षा काढणे, माती साफसफाई ही सर्व कामे ठेकेदार करणार आहे. त्यामुळे नातेवाईकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी हजार रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.नागरीकांनी कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणत्याही खाजगी त्रयस्थ व्यक्‍तीकडून अंत्यसंस्कार करुन न घेता अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

पर्यायी स्मशानभूमीचा शोधकोरोना विषाणू संसर्गाची तीव्रता वाढत चालली असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत निघाले आहे. येथील कापुसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीची जागा कमी पडत चालली आहे. ऐनवेळी अडचणी उदभवू नयेत यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral contract for private contractor in Islampur!