सोलापूरच्या 'रुद्रभूमीत' मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 8 मे 2018

सोलापूर - लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले अत्याधुनिक दिवे बंद पडल्याने लिंगायत स्मशानभूमीत (रुद्रभूमी) मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या ठिकाणी बसविण्यात आलेले जवळपास 10 दिवे बंद आहेत. 

सोलापूर - लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले अत्याधुनिक दिवे बंद पडल्याने लिंगायत स्मशानभूमीत (रुद्रभूमी) मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या ठिकाणी बसविण्यात आलेले जवळपास 10 दिवे बंद आहेत. 

लिंगायत समाजासाठी ही एकच स्मशानभूमी आहे. त्यामुळे सोलापूर शहराच्या चारी बाजूंचे लोक या ठिकाणी येतात. विजापूर रस्ता आणि होटगी रस्त्यावरील एखाद्या समाजबांधवाचे निधन झाले तर वाहनाने या ठिकाणी यावे लागते. चारीबाजूंनी वाढलेल्या शहरात लिंगायत समाजासाठी दुसरी स्मशानभूमी नसल्याने समाजबांधवांना आठ ते दहा किलोमीटर असलेल्या स्मशानभूमीत यावे लागते. त्यातच सायंकाळी अंत्यसंस्कार असतील तर ते फारच त्रासदायक ठरत आहे. जवळपास सर्वच दिवे बंद असल्याने मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागत आहे. 

काही वर्षांपूर्वी लिंगायत स्मशानभूमीसाठी खास तरतूद करण्यात आली आणि त्यातून या परिसरात चांगल्या सुधारणाही करण्यात आल्या. उंच संरक्षक भिंत, बसण्यासाठी पॉलिश फरशा, परिसरात प्रखर उजेडाचे दिवे बसविण्यात आले. काही वर्षांनंतर या स्मशानभूमीची दुरवस्था झाली. या ठिकाणी अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. मात्र आता ती रोडावली आहे, इतकेच नव्हे तर बसण्यासाठीच्या कट्ट्यांवर दारूच्या बाटल्या पडल्याचे दिसून येत आहे. या स्मशानभूमीला चौकीदार आहे, मात्र आत येण्यासाठी "खुष्की'चे मार्ग आहेत. 

मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या सोलापूरकरांना जिवंतपणी मरणयातना सोसाव्या लागतातच. पण, हा भोग मृत्यूनंतरही पिच्छा सोडत नाही. हद्दवाढ भागातील लिंगायत समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अंत्यविधीसाठी सात-आठ किलोमीटर लांब असलेल्या रुद्रभूमीत न्यावे लागते. अंत्यविधी रात्री असेल तर अपुऱ्या प्रकाशामुळे मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक

Web Title: Funeral in mobile torch light