सुनेने केले सासूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील घटना

- सून अश्‍विनी आणि त्यांचे पती सचिन अब्दुले यांनी घेतला निर्णय

-  शेतात अस्थी पुरून त्यावर वृक्षारोपण करून एक वेगळा पायंडा पाडला

- सून म्हणते, ही घटना माझ्या कायम स्मरणात राहील

करमाळा : आजारपणात सासूची सेवा करणाऱ्या सुनेने सासूबाईच्या मृत्यूनंतर आपल्या हस्ते सासूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय सून अश्‍विनी आणि त्यांचे पती सचिन अब्दुले यांनी घेतला. त्यांच्या हस्ते सासूचे अंत्यसंस्कार व इतर सर्व विधी करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारानंतर अस्थीचे पाण्यात विसर्जन न करता शेतात अस्थी पुरून त्यावर वृक्षारोपण करून एक वेगळा पायंडा पाडला. ही घटना करमाळा येथील आहे. 

करमाळा (घोलपनगर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रामकुवर मुरलीधर अब्दुले (वय 78) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना सचिन हा एकुलता एक मुलगा आहे. सचिन येथील महात्मा गांधी विद्यालय सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. 

रामकुवर अब्दुले या एक वर्षभरापूर्वी घरात पाय घसरून पडल्या. तेव्हापासून त्या आजारीच होत्या. आजारपणात त्यांची सून अश्‍विनी यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. घरातील सर्व कामे स्वतः करत सासूबाईंची सेवा सून अश्‍विनी यांनी अतिशय प्रेमाने केली. आता सासू रामकुवर यांच्या मृत्यूनंतर सून आश्‍विनी यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. 

अश्विनीने केली आईची सेवा
माझी आई आजारी पडल्यावर पत्नी अश्‍विनीने आईची खूप सेवा गेली. कधीही सेवा करताना हातचा राखला नाही. आईच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्यावेळी मी स्वतःच पत्नी आश्‍विनीच्या हस्ते सर्व कार्य करण्याचा निर्णय घेतला. याला वडिलांनीही तत्काळ होकार दिला. 
- सचिन अब्दुले, मुलगा, करमाळा 
 

सासूबाईंनी मला मुलीप्रमाणे सांभाळले

आमच्या छोट्या कुटुंबात मला मुलीप्रमाणे सासूबाईंनी सांभाळले. त्या आजारपणातून बऱ्या होतील अशी आम्हाला आशा होती. मात्र, त्या आमच्यातून गेल्या. मला आईचे प्रेम त्यांनी दिले. माझ्या हातून अंत्यसंस्कार व इतर कार्य करावे असे माझे पती सचिन यांनी ठरवले आणि मी ते केले. ही घटना माझ्या कायम स्मरणात राहील. 
- अश्‍विनी अब्दुले, सून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral services were held by Sune's mother-in-law