फर्निचर दुकानाला भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

बालिकाश्रम रस्त्यावरील न्यू स्टाइल फर्निचर दुकानाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

नगर : बालिकाश्रम रस्त्यावरील न्यू स्टाइल फर्निचर दुकानाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी ः बालिकाश्रम रस्त्यावरील गंधे मळ्यातील गजराज हॉटेलशेजारी नव्याने न्यू स्टाइल फर्निचर दुकान सुरू झाले आहे. दुकानदाराने मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक केली होती. या दुकानाला बुधवारी रात्री अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

आग विझविण्याची कसरत 
आगीची माहिती मिळताच महापालिका व एमआयडीसीच्या अग्निशामक बंब व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आटोक्‍यात आणली. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. या प्रकरणी राजू म्याना (रा. नगर) यांच्या खबरीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात जळिताचा गुन्हा दाखल झाला आहे. 
दरम्यान, बालिकाश्रम रस्त्यावरील गादी कारखान्याला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. ती आग कशाने लागली, हे अद्याप समजले नाही. 

शोध घेतला पाहिजे 
सावेडी उपनगरामध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला आग लागली होती. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कलेचे साहित्य आणि विविध कलाकृती जळून खाक झाल्या. त्या वेळी महापालिका आणि एमआयडीसीच्या अग्निशामक बंबांनी आग विझविली. मात्र, ती कशाने लागली हे अद्यापपर्यंत समोर आले नाही. त्यामुळे दुकाने व कारखान्यांना आगी नेमक्‍या कशा लागतात, याचा शोधही घेतला गेला पाहिजे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे. 
..... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The furniture shop is on fire