गडाख म्हणाले, मेव्हणे..मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नेवासे (नगर) : ""ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला; पण ते डगमगले नाहीत. त्यांना संपविण्याचा प्रयत्न करणारेच संपले. प्रशांत गडाख यांना हात लावणारा अजून जन्माला यायचाय,'' असा गर्भित इशारा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी दिला. आमदार बाळासाहेब मुरकुटे स्वत:बरोबरच पाहुण्या- मेव्हण्यांच्या विकासात दंग होते. "मेव्हणे.. मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे' असा त्यांचा कारभार सुरू असल्याची टीका गडाख यांनी केली.

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगाव (ता. नेवासे) येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे आयोजित संवाद मेळाव्यात गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग पाडळे होते. भेंडे ते देवगाव अशा मोटरसायकल फेरीने येत गडाख मेळाव्यास्थळी आले. प्रारंभी देवगावात पायी फेरी काढण्यात आली.

गडाख म्हणाले, ""देवगावकरांची माफी मागायची वेळ पाच वर्षांतच आपल्यावर का आली, याचे चिंतन आमदार मुरकुटे यांनी करावे. गेल्या निवडणुकीत जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले.''

गडाखांच्या भाषणादरम्यान तरुणांनी "इलाका तुम्हारा, धमाका हमारा' अशा घोषणा दिल्या. तो धागा पकडून गडाख म्हणाले, ""सोनईसारखेच देवगावही माझेच गाव आहे. हीच माझी जन्मभूमी, कर्मभूमी आहे. उलट, आमदार बाहेरचा आहे. देवगावातील शंभर तरुणांना नोकऱ्या देईन; फक्त देवगावातून शंकररावांना एक मत जास्त द्या.''

गेल्या विधानसभेला मुरकुटे यांना भक्कम साथ देणाऱ्या सौंदाळ्याचे सरपंच शरद आरगडे, नागेश आघाव, भाऊसाहेब वाघ यांची भाषणे झाली. "जवळचा कार्यकर्ता मोठा होऊ नये, याची काळजी मुरकुटे घेतात. त्यांनी आमचा केसाने गळा कापला, असा आरोप त्यांनी केला. प्रास्ताविक भगवान भगत यांनी केले. या वेळी देवगाव, कुकाणे, भेंड्यासह तालुक्‍यातील विविध गावांतील तरुणांनी "क्रांतिकारी'त प्रवेश केला.

प्रशांत पाटील गडाख यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले देवगाव येथील दीपाली वाल्हेकर व इरफान शेख यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब फुलारी व्यासपीठावर येताच टाळ्यांचा गजर झाला. बाळासाहेब लिंगायत यांनी आभार मानले.

लाव रे.. तो व्हिडिओ..!
पूर्वाश्रमीचे गडाखांचे विश्वासू मुरकुटे यांच्या तोंडून गडाख पिता-पुत्रांचे गेल्या 30 ते 40 वर्षांतील तालुक्‍यासाठीचे योगदान, विकासासाठी गडाखांची किती गरज आहे, असे गोडवे गाणारी चित्रफीतच सभेत प्रशांत पाटील गडाख यांनी सादर केली. त्यांनी "लाव रे तो व्हिडिओ' म्हणताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadhakh criticize to murkute