लक्ष्मीआजींच्या 'शंभरी'ने समाजासमोर घातला आदर्श

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

सोशल मीडिया हे तर वाढदिवस साजरे करण्याचे एक माध्यमच बनले आहे. कोणाचा वाढदिवस याला फारसे महत्त्व नसते, शुभेच्छांचा रतिब मात्र सुरू होतो. सामाजिक बदलाचा हा एक भाग बनला आहे. याच सामाजिक बदलात वृद्धांचे प्रश्‍नही वाढलेले आहेत.

गडहिंग्लज : बदलत्या सामाजिक परिस्थितीत वृद्धांचे प्रश्‍न दिवसेंदिवस वाढत आहेत. वृद्धांच्या घरातील आदराच्या स्थानाने हेटाळणीची जागा घेतली आहे. असे चित्र असताना अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील बाटे कुटुंबीयांनी लक्ष्मीआजींची शंभरी मोठ्या थाटामाटात साजरी केली.

सध्या सर्वत्र वाढदिवसाचे लोण पसरले आहे. राजकारणातील दादा, बाबा, आण्णा यांच्या छबी फलकावर झळकताना दिसतात. सोशल मीडिया हे तर वाढदिवस साजरे करण्याचे एक माध्यमच बनले आहे. कोणाचा वाढदिवस याला फारसे महत्त्व नसते, शुभेच्छांचा रतिब मात्र सुरू होतो. सामाजिक बदलाचा हा एक भाग बनला आहे. याच सामाजिक बदलात वृद्धांचे प्रश्‍नही वाढलेले आहेत. म्हणूनच अत्याळ येथील लक्ष्मीबाई धोंडिबा बाटे यांचा त्यांच्या कुटुंबीयांनी साजरा केलेला शंभरावा वाढदिवस साऱ्या वाढदिवसांपेक्षा वेगळा ठरतो.

लक्ष्मीबाई यांचे सुपुत्र शंकर बाटे हे लोकशाहीर आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनसह विविध वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. वयाच्या सत्तरीत असले तरी शाहीर परंपरा टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांनी आपल्या आईचा शंभरावा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय घेतला.
वाढदिनी लक्ष्मीबाई यांची साखरतुला झाली. ती साखर दान केली. लक्ष्मीआजीसह परतवंडांच्या हातांनी केक कापण्यात आला. अत्याळसह लगतच्या बेळगुंदीतील सुमारे पाचशेहून अधिक ग्रामस्थांनी या वाढदिवसाला उपस्थिती लावली होती. रात्री शाहीर शंकर बाटे आणि पार्टीचा शाहिराचा कार्यक्रम झाला.

Web Title: gadhinglaj lady lakshmi completes hundred years