गडहिंग्लज पालिका 35 कोटींचा प्रस्ताव सादर करणार

Gadhinglaj Municipality Get 35 Krore kroposal Kolhapur Marathi News
Gadhinglaj Municipality Get 35 Krore kroposal Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतंर्गत कामासाठी आणि हद्दवाढीतील विविध मूलभूत सुविधा पुरवण्यास शासनाकडे 35 कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यास पालिका सभागृहाने आज विशेष सभेत मान्यता दिली. या सर्व विकास कामांचा आराखडा तयार झाला असून हद्दवाढ क्षेत्रात नवीन आणि दुरूस्ती आवश्‍यक असलेल्या शौचालयांच्या कामांचे इस्टिमेट करण्याची सूचना नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी अधिकाऱ्यांना दिली. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असून कागल-गडहिंग्लजचे आमदार हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री तर सतेज पाटील पालकमंत्री झाले आहेत. यामुळे शहर आणि परिसरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पालिकेने विविध कामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. सुवर्णजयंती योजनेतून 14 कोटी 51 लाख, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत 7 कोटी 6 लाख, हद्दवाढ विकासासाठी 10 कोटी 82 लाख, नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून 2 कोटी 8 लाख आणि 2019-20 मधील दलित वस्ती अनुदान मागणीचा 1 कोटी 27 लाखाचा प्रस्ताव सादर करण्यास सभागृहाने मंजूरी दिली. 

नगरसेवक दीपक कुराडे यांनी वृक्षलागवड विषयाच्या आढावावेळी गतवर्षी सहा हजारावर खड्डे मारले असून साडेतीन हजार झाडांची लागवड केल्याचे सांगून उर्वरित खड्ड्यांचा खर्च पालिकेवर पडल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर वृक्ष प्राधिकरणचे अनिल गंधमवाड यांनी रोपे कमी उपलब्ध झाल्याने खड्डे शिल्लक राहिल्याचे सांगितले. शिल्लक खड्ड्यांमध्ये यावर्षी वृक्षारोपण करून घेण्याची सूचना नगराध्यक्षा कोरी यांनी केली. रेश्‍मा कांबळे यांनी संकेश्‍वर रोडवरील मुस्तफा गॅरेज परिसरातील रस्ता खराब झाला असून नागरिकांची गैरसोय होत असल्याने हा रस्ता दलित वस्तीमधून करण्याची सूचना केली. त्यावर कोरी यांनी भाजप सरकारने निधी देण्यात या पालिकेवर अन्याय केला असून सुदैवाने मुश्रीफ व सतेज पाटील मंत्री झाल्याने आता सर्वांनी मिळून विकासनिधीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

महेश कोरी यांनी हद्दवाढ क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी नवीन शौचालयांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर कोरी यांनी शौचालयांच्या या कामाचे इस्टिमेट करण्याची सूचना केली. राजेश बोरगावे यांनी मैला उपसा टॅंकर बंद असल्याकडे लक्ष वेधले. तत्काळ या टॅंकरची दुरूस्ती करण्यासह हद्दवाढ क्षेत्रातून मैला उपसाची मागणी वाढल्याने नवीन एक टॅंकर खरेदी करण्याची सूचना महेश कोरी व बोरगावे यांनी केली. हद्दवाढ क्षेत्रातील काही वसातींना शेंद्री धरणातून थेट दुषित पाण्याचा पुरवठा होत असून पालिकेने या वसाहतीसाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याच्यादृष्टीने तातडीने हालचाल करण्याची सूचना महेश कोरी यांनी केली. पक्ष प्रतोद बसवराज खणगावे, बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर, हारूण सय्यद, शुभदा पाटील, नितीन देसाई यांनी चर्चेत भाग घेतला. 


कोरी-कुराडेंमध्ये खडाजंगी 
भाजपचे नगरसेवक दिपक कुराडे यांनी दलित वस्ती सुधार योजनेतून काही विषय दोन-तीन वेळा सभागृहासमोर येवूनही कामे झाली नसल्याकडे लक्ष वेधताच नगराध्यक्षा कोरी आक्रमक झाल्या. राज्यात तुमचेच सरकार होते, भाजपने किती निधी दिला, कामे किती झाली याची माहिती घेण्याची जबाबदारी तुमची होती. सरकारकडून निधी आणून प्रभागातील कामे करून घेण्याची सूचना मी स्वत: तुम्हाला केली होती. त्यावेळी तुम्ही झोपा काढला काय, असा प्रश्‍न करून सभागृहात माहिती घेवून बोलावे, जेणेकरून सभेचा वेळ वाया जाणार नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला. कोरी व कुराडेंमधील या खडाजंगीने सभागृहात तणावपूर्ण शांतता पसरली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com