खेळाडूंचा खुंटणार विकास

दीपक कुपन्नावर
रविवार, 27 ऑगस्ट 2017

गडहिंग्लज - राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने यंदापासून शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी इयत्तेची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १४ आणि १७ वर्षे गटात नववी आणि अकरावीच्याच विद्यार्थ्यांचा भरणा होत आहे. त्यामुळे नवोदित शालेय खेळाडूंची संधी हिरावली जात आहे. परिणामी, खेळाडूंच्या जडणघडणीत महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या शालेय स्तरावरच नवोदितांचा विकास खुंटणार आहे. यामुळे खेळायलाच संधी मिळणार नसेल तर सराव कशाला करायचा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी क्रीडा विभागातर्फे शालेय स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात. १४, १७ आणि १९ अशा तीन वयोगटात या स्पर्धा होत असतात. पारंपरिक कबड्डी, खो-खो, कुस्ती, मैदानी या भारतीय खेळासह व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यांसह सुमारे पन्नासभर नव्या खेळांचा यामध्ये समावेश आहे. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे दिली जातात. गुणवत्ता दाखविण्यासाठी नवोदित खेळाडूंना या स्पर्धाच एकमेव व्यासपीठ आहेत. त्यामुळे या स्पर्धांत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत आहे. 

एकीकडे शालेय स्पर्धांतील सहभाग वाढत असताना, यंदा मात्र नव्या नियमाने याला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. १४ वर्षे वयोगटासाठी पूर्वी आठवी तर सतरा वर्षे वयोगटासाठी दहावीपर्यंतची मर्यादा होती. यंदा ही मर्यादा हटविण्यात आली आहे.त्यामुळे १४ वर्षे वयोगटात बहुतांशी नववीतील तर सतरा वर्षे वयोगटात अकरावीच्या खेळाडूंनाच सर्वाधिक प्राधान्य आहे. १४ वर्षे वयोगटातील सहा ते आठ आणि १७ वयोगटात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना संधी हुकणार आहे. अशा खेळाडूंची संख्या सर्वात  मोठी आहे. 

नवोदित खेळाडूंना खेळण्याची अधिकाधिक संधी मिळाल्या तरच त्यांचा खेळातील आणि पर्यायाने सरावातील इंटरेस्ट टिकून राहतो, असाच क्रीडाशास्त्राचा नियम आहे. नव्या नियमामुळे आठवी, नववी आणि दहावी अशा तीन तुकड्यातील खेळाडूंची संधी मारली जात आहे.

दर्जावरही परिणाम... 
खेळात नवोदितांची संख्या अधिक असली तरच स्पर्धात्मक वातावरणामुळे खेळाडूंचा दर्जा सुधारत असतो. नव्या नियमामुळे नवोदितांची संख्या घटणार आहे. यामुळे भविष्यात दर्जेदार खेळाडूंची संख्याही घटण्याची चिन्हे आहेत. 

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना खेळण्याची भरपूर संधी दिली तरच त्यांचा खेळातील रस टिकून रहातो. नव्या नियमाने अनेकांना संधी मिळणार नाही. त्यामुळे हा नवा नियम खेळाच्या विकासाला पाठबळ देणारा नाही. 
- टी. बी. चव्हाण, (माजी क्रीडा शिक्षक)

Web Title: Gadhinglj news sports student