गगनबावडा परिसरावर हिरवाईची झालर

Karul ghat
Karul ghat

असळज - निसर्गाचे अलौकिक वरदान लाभलेल्या व जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्‍यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटांतील लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. दोन्ही घाटांतील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हौशी पर्यटकांचे पाय घाटमार्गाकडे वळल्याने गगनबावडा परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. 

प्रति महाबळेश्‍वर असलेल्या गगनबावड्याला करूळ आणि भुईबावडा या दोन घाटमाथ्यांची निसर्ग देणगी लाभली आहे. घाटांच्या वाटेचा थाट, उंच-उंच कडे, दरीत दिसणारी कौलारू घरे, हिरव्यागार पर्वतरांगा, त्यावर आच्छादलेला धुक्‍याचा दाट थर, उंच कपारीतून खोल दरीत कोसळणारे धबधबे, अंगाला झोंबणारा गार वारा, त्यातूनच अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी या सर्व निसर्गाच्या मुक्‍त सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हौशी पर्यटक दोन्ही घाटांत येत असतात. 

करूळ घाटातील यू आकाराच्या वळणावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसू लागली आहे. या ठिकाणाहून जवळपास ५०० फूट खोल दरी, उंच शिखरावर भाविकांचे श्रद्धास्थान असलेला मर्द किल्ले गगनगड, गगनगिरी महाराजांच्या गगनगडाचे दर्शन होत आहे. गगनगिरी गडावरून सारे कोकण नजरेच्या टप्प्यात दिसते आहे. पावसात भिजण्याच्या आनंद लुटण्याबरोबरच येथे पाऊस व धुक्‍याच्या पाठशिवणीचा खेळाचा आनंदही येथे येणाऱ्या पर्यटकांना लुटता येतो. करूळ घाटामध्ये पर्यटन थांबा बनविण्यात आला असून, या ठिकाणी वाहने वळविण्यासाठी पुरेशी जागा असल्याने पर्यटक गाड्या थांबवून पर्यटनाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. गगनबावड्याहून भुईबावडा घाटात प्रवेश करताच १ किलोमीटर अंतरावर लागणारा पहिला धबधबा अगदी उंचावरून कोसळत असल्याने या धबधब्यावर स्नानाचा आनंद पर्यटक थांबून घेत आहेत. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी पर्यटकांची घाटमार्गात गर्दी दिसून येते. 

दृष्टिक्षेपात गगनबावडा -
 ऐतिहासिक गगनगड, गगनगिरी महाराज मठ 
 करूळ, भुईबावडा घाट व घाटात फेसाळणारे धबधबे 
 अणदूर, लखमापूर, कोदे, वेसरफ तलाव 
 पळसंबे येथील रामलिंग (पांडवकालीन एकपाषाणी मंदिरे) 
 पंत अमात्यांचा वाडा 
 मोरजाई पठार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com