गजानन महाराज पालखीचा मोहोळ तालुक्यात प्रवेश

राजकुमार शहा
गुरुवार, 19 जुलै 2018

आषाढी एकादशी निमित्त भूवैकुंठीच्या सावळ्या विठूच्या भेटीसाठी निघालेल्या शेगांव येथील श्री. संत गजानन महाराज पालखी सोहळयाने आज गुरूवारी सकाळी मोहोळ तालुक्यात प्रवेश केला. शिंगोली-तरटगांव येथे या पालखीचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

मोहोळ - आषाढी एकादशी निमित्त भूवैकुंठीच्या सावळ्या विठूच्या भेटीसाठी निघालेल्या शेगांव येथील श्री. संत गजानन महाराज पालखी सोहळयाने आज गुरूवारी सकाळी मोहोळ तालुक्यात प्रवेश केला. शिंगोली-तरटगांव येथे या पालखीचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

पालखी सोहळा काल सीना तीरावरील तिऱ्हे (ता उ. सोलापूर ) येथे मुक्कामी होता. सकाळी सहाच्या सुमारास तिऱ्हेकरांचा निरोप घेत सीना नदी पार करून या पालखीने शिंगोली-तरटगाव येथे मोहोळ तालुक्यात प्रवेश केला. तालुका वासियांच्या वतीने गटविकास अधिकारी अजिक्य येळे निवासी नायब तहसिलदार जीवन क्षीरसागर, पंचायत समितीच्या सदस्या सुनीता भोसले, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अशोक भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तानाजी राठोड, शिंगोलीचे सरपंच मंडाबाई घोडके, उपसरपंच सागर मोटे, विठ्ठल माळी, मंडलाधिकारी बेलभंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, दिपक माळी, चंद्रकांत मासाळ, नंदकुमार भोसले, महावीर तरंगे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.

येथील स्वागतानंतर पालखी सोहळा भोजनासाठी कामती खुर्द येथे पोहोचताच पालखीचे तेथेही जंगी स्वागत करण्यात आले. सरपंच संजय पाटील, उपसरपंच अंबादास मोटे यांच्यासह ग्रामस्थांनी श्रींंच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करीत स्वागत केले. यानंतर श्रींची पालखी येथे उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपात ठेवण्यात आली. यावेळी परिसरातील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या वतीने वैष्णवजनांना भोजण देण्यात आले. याकामी, श्री. संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

भोजनानंतर अल्पशा विश्रांतीनंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास हरिनामाचा जयघोष करीत वैष्णव कामती बुद्रुककडे मार्गस्थ झाले. येथेही  ग्रामस्थानी पालखीचे स्वागत केले . यानंतर हा सोहळा वाघोली मार्गे पंढरीकडे मार्गस्थ झाला.

दरम्यान, पालखी मार्गावर विविध संस्था व भाविकांनी वारकऱ्यांना चहा, व फराळाचे वाटप केले.

Web Title: gajanan maharaj palkhi entered in mohol taluka