टनभराच्या ‘गज्या’ने केले मालकाला कर्जमुक्त

बाळासाहेब गणे
मंगळवार, 16 जुलै 2019

  • कर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने केले मालकालाच कर्जमुक्त. 
  • कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची चार राज्यात ख्याती.
  • सुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना. 

तुंग - कर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने मालकालाच कर्जमुक्त केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची ही कथा. चार राज्यात ख्याती असलेल्या सुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना होते. आता त्याच्या या वजनदार कामगिरीची लिम्का बुकमध्ये नोंद होण्याची शक्‍यता आहे.

गजा घरच्या जर्सी गायीचे वासरू. ऑक्‍टोबर २०११  मध्ये त्याचा जन्म झाला. या बाळाचे पाय पाळण्यातच म्हणजे लहान वयातच दिसू लागले. सायमोते यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले. प्रसंगी पदरमोड करून कर्ज काढून त्याला खुराक कमी पडू दिला नाही. आता आठ वर्षाचा झाला आहे. सहा बाय दहा फूट उंची-लांबीच्या गज्याने टनाचा काटा पार केला आहे.

जन्म बैलाचा देह मात्र हत्तीचा म्हणून नाव गज्या. आता गज्याने नाव कमावले आहे आणि पैसादेखील कमावत आहे. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा  व वजनामुळे त्याला ठीकठिकाणच्या कृषी प्रदर्शनांमध्ये मागणी असते. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सुमारे साठ प्रदर्शनांमध्ये त्याने आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. गज्या जाईल तिथे त्याच्यासोबत सेल्फी काढून घ्यायला झुंबड उडते.

अगदी आमदार-खासदारांसारखे नेतेमंडळींना हा मोह आवरलेला नाही. नारायण राणे, विजयसिंह मोहिते-पाटील, उदयनराजे भोसले अशा नेतेमंडळींनी त्याच्यासोबत फोटोसेशन केले आहे. काही प्रदर्शनामध्ये त्याच्यासाठी तिकीट लावले होते. सध्या त्याची वर्षाकाठी तीन-चार लाखांची कमाई असते. त्यातून सायमोते यांच्या डोईवरचे मोठे कर्ज दूर झाले. या आनंदप्रीत्यर्थ ते दरवर्षी बेंदराला त्याची सवाद्य मिरवणूक काढतात.  यादिवशी शेदोनशे स्नेहीजणांची पंगत उठते.

खुराक - बडदास्त
सध्या प्रदर्शनांचा सीझन नसल्याने गज्याने वजन कमी केलेय. मात्र  उन्हाळ्यामध्ये गजाला खास कलिंगडे व गाजरांची सोय असते. उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी गोठ्यात पंखा असतो. बसायला रबरी मॅट असते. सीझनमध्ये त्याला सकाळ-संध्याकाळ सातू, हरभरा, हुलगा, मटकी असे एकत्रित दहा किलो रोज खाद्य व तीन वेळा ओला चारा असतो. दर रविवारी नदीला आंघोळीला नेले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gajaya bull made the owner free from debt special story