हुतात्मा जवान गणेश ढवळे यांना अखेरचा निरोप

Ganesh Davle young martyr
Ganesh Davle young martyr

वाई - आंबेदरावाडी-आसरे (ता. वाई) येथील हुतात्मा जवान गणेश कृष्णा ढवळे (वय 29) यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. धोम जलाशयालगत कमंडलू नदीतीरी शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. "भारत माता की जय, गणेश ढवळे अमर रहे'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. वीर जवानाच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता.

जम्मू-काश्‍मीरमध्ये बच्छल विभागात कर्तव्य बजावत असताना 28 जानेवारी रोजी हिमस्खलन झाल्याने गणेश ढवळे यांच्यासह महाराष्ट्रातील पाच जवान बर्फाखाली गाडले गेले. चार-पाच तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर उपचार सुरू असताना 30 जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या मागे पत्नी रेश्‍मा, पाच महिन्यांचा मुलगा समर्थ, आई राधाबाई, वडील कृष्णा ऊर्फ किसन आणि विवाहित बहिणी निर्मला, जयश्री व भाग्यश्री असा परिवार आहे.

गणेश यांचे पार्थिव आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेदरा येथील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी पत्नी रेश्‍मा, आई राधाबाई, वडील कृष्णा आणि कुटुंबीयांना आक्रोश अनावर झाला. त्यानंतर लष्कराच्या सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा सुरू झाली. दक्षिण कमांडचे जवान, जिल्हा पोलिस दल, छात्रसेनेचे जवान तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. वैभवनगर येथील स्मशानभूमीजवळ धोम जलाशयालगत कमंडलू नदीच्या तीरावर अंत्यसंस्कारासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी पार्थिव आल्यानंतर लष्कराच्या वतीने गणेशचे वडील कृष्णा ढवळे यांच्याकडे भारतीय शौर्याचे प्रतीक असलेला तिरंगा प्रदान करण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील यांनी पुप्षचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. जिल्हाधिकारी डॉ. आश्‍विन मुद्‌गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, कर्नल कावेरीअप्पा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल राजेंद्रकुमार जाधव, मराठा लाईट बटालियनचे सुभेदार चिमणलाल मेहरजी, सुभेदार राहुले, सुभेदार शिवाजी देशमुख, 56 आर. आर. बटालियनचे श्रीधर पाटील आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून वीर जवान गणेश यांना मानवंदना दिली. त्यानंतर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी वडील कृष्णा यांनी अग्नी दिला. यावेळी वीरमाता राधाबाई, वीरपत्नी रेश्‍मा यांच्यासह अनेकांनी हंबरडा फोडला.

याप्रसंगी प्रताप पवार, रोहिदास पिसाळ, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, अशोक गायकवाड, काशिनाथ शेलार, महेश शिंदे, सचिन घाटगे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, राधाताई शिंदे, उपसभापती शोभा सणस, रतनसिंह शिंदे, राजेंद्र शेलार, लेप्टनंट समीर पवार, विकास शिंदे, संतोष आंबवले, चंद्रकांत सणस, जगदीश कांबळे, पोलिस उपअधीक्षक राजाराम पाटील, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, तहसीलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, कमलाकांत म्हेत्रे, क्रांतीकुमार मिरजकर, सी. व्ही. काळे, ज्ञानदेव सणस, विक्रांत डोंगरे, दाजी सणस, चंद्रकांत शेलार, अशोक मांढरे आदींसह सात ते आठ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.

अखेरची भेट गणेशोत्सवात

गणेश यांचे शालेय शिक्षण आसरे, धोम, वाई येथे झाले होते. बारावीनंतर ते 2012 मध्ये "12 मराठा लाईट इन्फंट्री'मध्ये भरती झाले. आजोळी वडाचीवाडी (अभेपुरी) येथे शिक्षणासाठी त्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे अभेपुरीसह गावागावांतील सार्वजनिक मंडळे व सामाजिक संस्थांनी श्रद्धांजलीचे फलक लावले होते. वाईतील गंगापुरीपासून मेणवली, भोगाव, धोम, वेलंग आदी गावांत रांगोळ्या काढून पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक थांबले होते. गणेशचा विवाह 2015 मध्ये चिखली-वाडकरवाडी येथील दिलीप लक्ष्मण देसाई (हगवणे) यांच्या कन्येशी झाला होता. गणेशोत्सवात गणेश सुटीसाठी घरी आला होता. त्यावेळीच कुटुंबीयांची शेवटची भेट झाली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com