संस्थानच्या गणपतीला थाटात निरोप

संस्थानच्या गणपतीला थाटात निरोप

सांगली - शहराच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव असलेल्या गणपती पंचायतनच्या श्रींचे  पाचव्या दिवशी थाटात विसर्जन झाले. थंड पावसाचा शिडकाव्यात आणि भाविकांच्या उत्साहाच्या उधाणात निघालेली ही मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर विसर्जित झाली. रथामध्ये विराजमान श्री आणि समोर ढोल-ताशे, लेझीम, बॅंड आणि वाद्यवृंदांवर ताल धरलेले शेकडो भगवे फेटेधारी असा डामडौल ऐतिहासिक वातावरणात नेणारा होता. ‘बाप्पा मोरयाऽऽ’चा जयघोषाने संपूर्ण मिरवणूक मार्ग दुमदुमला.

श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता दरबार हॉलमध्ये श्रींची आरती झाली. श्रींच्या विधिवत पूजेनंतर दरबार हॉलमध्ये पानसुपारीच्या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, हिमालयराजे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजय काळम -पाटील, उपमहापौर विजय घाडगे, नेते शेखर  माने, शिवसेनेचे बजरंग पाटील आदींचा मिरवणुकीत सहभाग होता.

पानसुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. यामध्ये घोडेस्वार, भालदार, चोपदार, नाद प्रतिष्ठाचा, रुद्र  पथकांचा ढोल-ताशा, ध्वजपथक, मुलींचे लेझीमपथक, हलगीपथक, सनई-चौघडा यासह गंधर्व बॅंड सहभागी झाला होता. रथयात्रेचा संपूर्ण मार्ग सुंदर, आकर्षक रांगोळ्यांनी रेखाटला होता.

दुपारी सव्वा चार वाजता रथयात्रा राजवाडा चौकात  आली. याठिकाणी काही काळ ती रेंगाळली. त्यानंतर  पटेल चौक, गणपती पेठ मार्गे मिरवणूक गणपती मंदिर येथे आल्यानंतर ‘श्रीं’ची आरती झाली. 

मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीसह जिल्हा व उत्तर कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले, गूळ, खोबरे, खजूर व प्रसादाची उधळण सुरू होती. पावसामुळे रस्त्यांवर निसरडे होते त्यामुळे ते गोळा करण्यासाठी धावपळ होती. गणपती मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर भाविकांनी मोठा जयघोष केला. त्यानंतर टिळक चौक मार्गे मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर पोहोचली. मावळत्या

सूर्याला साक्षी ठेवून गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ अशा जयघोषात ‘श्रीं’ची मूर्ती सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन मूर्तीचे विधिवत विसर्जन झाले.

ढोल, ताशा आणि महाप्रसाद
यंदाच्या मिरवणुकीत नाद प्रतिष्ठा आण रुद्र पथकांचा  ढोल-ताशा आकर्षण होता. पथकातील तरुण-तरुणींचा आवेश आणि जल्लोष भाविकांच्या उत्साहाला उधाण देणारा होता. गणपती मंदिराजवळ ताशाचा तडतडाट टिपेला पोहोचला. टिळक चौकात सांगतेवेळी तोबा गर्दी झाली. दुपारपासूनच वखारभाग, हरभट रस्ता, कापड पेठेकडे अवजड वाहनांना रोखण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी टळली. स्टेशन चौक, राजवाडा चौकात व्यापारी व गणेश मंडळांनी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com