'गदका'त चित्तथरारक खेळांचे प्रदर्शन; साहस, धडकी... अन्‌ 'बोलेसो निहाल' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सांगली : कोण डोक्‍यात ट्युब लाईट फोडून घेतो, तर कोणी तलवारबाजी दाखवतो. कुणाच्या डोक्‍यात नाराळ फुटतो, तर एक बहाद्दर चक्क कपाळावर तलवार वाकवतो. हे सारं ऐकल्यानंतर सुद्धा धडकी भरते. गणेशोत्सवानिमित्त आज स्टेशन चौकात या साऱ्या साहसी खेळांचा थरार सांगलीकरांना अनुभवला. त्या पंजाबी पाजींचं साहस, प्रेक्षकांच्यातील धडकी अन्‌ शेवटी 'बोलेसो निहाल'चा गजर असंच सारं वातावरण होते. 

सावकार गणपती आणि समस्त पंजाब समाजातर्फे पंजाबमधील साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'गदका पार्टी'चे आयोजन केले. सायंकाळी सहाच्या सुमारास खेळांच्या प्रदर्शनाला सुरवात झाली. उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, मंडळाचे संस्थापक अजिंक्‍य पाटील, अशोक मासाळे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. 
दलेर खालसा ग्रुपतर्फे ही गदका पार्टी होती. पहिल्यांची तलवार बाजीचे खेळप्रकार दाखवले. दांड पट्टाचेही प्रकार दाखवले. विशेष म्हणजे कपाळावर चक्क तलवार वाकवली. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर ड्रिल मशीन गळ्यावर चालण्याचा प्रकारही दाखवला. 

एका बहाद्दराने चार दुचाकी रोखाचा विक्रमही करुन दाखवला. तर एका 'पाजी'ने डोळ्यात मीठ घालून नारळ फोडून दाखवले. तापती साखळी घेवून त्याला हात लावण्याचा धाडसी प्रकारही साऱ्यांना धडकी भरवणारा होता. खेळ प्रकार सुरु असतांना सारा स्टेशन चौक हाऊसफुल्ल झाला होता. तब्बल दोन तास हे खेळ प्रकार सुरु होते. नानर सिंग, अहालो सिंग, लाबे सिंग, सुखेर सिंग यांच्यासह 17 जणांनी सादरीकरण केले. या साहसी खेळाचे फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यावेळी पंजाब समाजाचे मनजित सिंग, मनमोहन सिंग, दातार सिंग, धुपेंद्र सिंग, विकी चड्डा, बिट्टू काटानया, अमरजीत कंगुरा, शिवसेनेचे बजरंग पाटील, मनोहर सारडा, प्रवीण गाडे, अशोक शेठ, दिपक कपाले, शहेनशा मकानदार, चेतन माने, प्रसाद रिसवडे, गजानन खरात उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. 

काय आहे गदका ? 
गदगा हा पंजाबमध्ये पारंपारिक खेळ प्रकार आहे. सुमारे तीनशे वर्षापूर्वीपासून हा खेळ प्रकार खेळला जातो. त्यातून पंजाबच्या धाडसी संस्कृतीचेही दर्शन घडवले जाते. तो खेळ प्रकार सर्वत्र समजावा यासाठी नवाशेरा (पंजाब) येथील दलेर खालसा ग्रुपने प्रदर्शन करण्यास सुरवात केली. भारतासह विविध देशातही या ग्रुपने प्रदर्शन केले आहे. तसेच अनेक रियालिटी शोसह विक्रमही यांच्या नावावर नोंद आहेत. 

Web Title: ganesh festival 2017 sangli punjabi adventurous game gadka