सांगलीतील गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव

सांगलीतील गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव

सांगली - समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे. यंदाचे हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे.

मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव या चुलत्या-पुतण्यात सन १७९९ ला वाटण्या झाल्या. त्यानंतर चिंतामणराव मिरज किल्ल्यातून बाहेर पडले. सांगली येथे नवी राजधानी करण्याचे त्यांनी ठरवले. गणेशदुर्ग नावाचा  भुईकोट किल्ला बांधायला सुरवात केली. तसेच आराध्य दैवत श्री गणपतीचे मंदिर बांधण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. सन १८११ मध्ये कृष्णाकाठी गणेश मंदिराचे काम सुरू झाले.  

श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली संस्थानची स्थापना करून राज्यकारभार सुरू केला. मात्र हे सर्व गणेशाचे आहे; आपण केवळ मुखत्यार आहोत अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे मंदिराचे बांधकाम  होईतोपर्यंत मंदिराजवळील वाड्यातच त्यांचा मुक्काम राहिला. मंदिराच्या बांधकामासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा मागविण्यात आला.  जोतिबाच्या डोंगरातून काळा पाषाण आणला.  

सन १८१४ च्या सुमारास पाया घातला. सुमारे ३० वर्षे काम सुरू होते. १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजाअर्चा विधी झाला.अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती भीमाण्णा आणि मुकुंदा पाथरवट यांसारख्या स्थानिक कारागिरांकडून बनविण्यात आल्या. सन १८४७ मध्ये शिखर पूर्ण झाले. मार्गशीर्ष महिन्यात सुवर्णकलशारोहण झाले. हा कार्यक्रम मोठ्या समारंभाने करण्यात आला. मार्गशीर्ष शुद्ध नवमी छ. ७ मोहरम शके १७६९ म्हणजेच १६ डिसेंबर १८४७  रोजी कलशारोहण झाले.

मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या पुढील संगमरवरी कमान मात्र स्वातंत्र्यपूर्व दशकात बांधण्यात आली. या कमानीमुळे मंदिराचे सौंदर्य उठून दिसू लागले. या कमानीचा दर्शनी तांबडा दगड संगमरवरी असून आतील दगड काळा पत्थर आहे. त्यासाठी जयसिंगपूरच्या खाणीतून दगड आणण्यात  आला. संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह श्री गणेशाची  सुबक मूर्ती आहे. मुख्य मंदिराभोवती श्री चिंतामणेश्वर हे महादेवाचे मंदिर, चिंतामणेश्वरी हे देवीचे मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरे आहेत. दरवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा गणेशोत्सव होतो. हा उत्सव खूपच प्रसिद्ध आहे. सध्या मंदिर श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखालील श्री गणपती पंचायत ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराच्या सुशोभीकरणासह सर्व व्यवस्था सांभाळली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com