कोल्हापूर : गणेशोत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त करण्याचा पोलिस यंत्रणेचा निर्धार

कोल्हापूर : गणेशोत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त करण्याचा पोलिस यंत्रणेचा निर्धार

कोल्हापूर - गणेशोत्सवाचे वेध लागले असताना त्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाचाही गणेशोत्सव ध्वनिप्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार पोलिस यंत्रणेने घेतला आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी सज्ज आहेत. कायद्याचा भंग करणाऱ्या मंडळासह ध्वनियंत्रणेचा मालक, चालकांची गय केली जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिला.

कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला आहे. त्यात हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्याच्या तयारीला सार्वजनिक मंडळे लागली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत पोलिस यंत्रणेची भूमिका काय राहील, हे डॉ. वारके यांच्याकडून ‘सकाळ’ने जाणून घेतले.

पूरपरिस्थितीने जिल्हा हादरून गेला आहे. सर्वच स्तरांतून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील मंडळांनी गणेशोत्सव अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन साधेपणाने साजरा करण्याचे आणि प्रत्येकी २१ हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले. ही बाब कौतुकास्पद आहे. याचे अनुकरण जिल्ह्यातील सर्वच मंडळांनी करून राज्यात नव्हे, तर देशात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन डॉ. वारके यांनी केले. यंदाचा गणेशोत्सव हा ध्वनिप्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार पोलिस यंत्रणेने केला आहे. त्याबाबतचे आदेशही त्यांनी परिक्षेत्रातील पाचही पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. 

गणेशोत्सवात जर कोणी ध्वनिप्रदूषणाचा भंग केल्यास संबंधित सार्वजनिक मंडळाच्या १२ ते १५ जणांच्या कार्यकारिणीसह ‘सिस्टीम’ मालक, चालक, वाहनचालक-मालकावर तातडीने कडक कारवाई केली जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही. यावर पोलिस यंत्रणेने आतापासून लक्ष केंद्रित केले आहे. सिस्टीम मालकांनाही तशा सूचना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील राजारामपुरीतील गणेश आगमन ते विसर्जन मिरवणुकीत ‘सिस्टीम’चा दणदणाट करून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून गणेश मंडळांसह कार्यकारिणीला सूचनाही दिल्या जात आहेत.

ध्वनिप्रदूषण करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर जागेवरच कारवाई केली जाईल. संबंधित ध्वनियंत्रणा जप्त केली जाईल. कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. गरज भासल्यास याबाबतच्या कारवाईसाठी स्वतंत्र पथकेही तैनात केली जातील असे डॉ. वारके यांनी स्पष्ट केले.

यंदाचा गणेशोत्सव ध्वनिप्रदूषण मुक्तच साजरा केला जाईल. मिरवणुकीत कोणीही ध्वनिप्रदूषण करण्याचा प्रयत्न करू नये. जी मंडळे कायद्याचे उल्लंघन करतील, त्या मंडळांच्या संपूर्ण कार्यकारिणीवर तातडीने कडक कारवाई केली जाईल. कारवाईमुळे पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात येणार नाही, याबाबत पालकांनीही आता दक्ष राहावे. 
- डॉ. सुहास वारके
, विशेष पोलिस महानिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com