पीओपीच्या जंजाळात शाडूच्या मूर्तीही सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पर्यावरणाविषयी जागरुकता समाजात कासवगतीने का होईना वाढू लागली असून, पीओपीच्या मूर्ती टाळून शाडू मातीच्या गणेश मूर्तींची यावर्षी मागणी वाढली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन शहराच्या विविध भागातील कलाकारांनी शाडूच्या विविध आकारांतील मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध केल्या आहेत.

सातारा - पर्यावरणाविषयी जागरुकता समाजात कासवगतीने का होईना वाढू लागली असून, पीओपीच्या मूर्ती टाळून शाडू मातीच्या गणेश मूर्तींची यावर्षी मागणी वाढली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन शहराच्या विविध भागातील कलाकारांनी शाडूच्या विविध आकारांतील मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध केल्या आहेत. 

पर्यावरणाचा कोणताही विचार न करता गेले कित्येक वर्षे पीओपीच्या जंजाळात नागरिक अडकले गेले आहेत. शहराच्या विविध भागात अगदी राजवाड्यापासून नव्या महामार्गानजीक कोरेगाव-सातारा रस्त्याच्या दुतर्फा पीओपीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि गुजरातमधील मूर्तीकारांनी तयार केल्या आहेत. आता गणेशोत्सव जवळ आल्याने रंगकामाला कुंभारवाड्यात वेग आला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुलनेने स्वस्त असल्याने गेल्या काही वर्षांत नागरिकांचा ओढा या मूर्तींकडे वाढला आहे. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती वेगाने तयार करता येतात. पावसाळा कितीही असला तरी त्या वाळतातही लवकर. त्यामुळे त्या वेळेत तयारही होतात. यामुळे कलाकारांचा कल पीओपीपासून मूर्ती तयार करण्याकडे वाढला आहे. अगदी ग्रामीण भागातील कुंभारवाड्यांतही कलाकारांच्या तरुण पिढीने गाळाच्या मातीपासून मूर्ती करणे जवळजवळ बंद केले आहे. या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते, या मूर्तींच्या विसर्जनाने नद्यांचे पाणी प्रदूषित होते. मात्र, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. परंतु, अनेक सुज्ञ नागरिक आता विचार करू लागले असून, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींना पसंती देऊ लागले आहेत.

शहरात या मूर्ती अल्प प्रमाणात का होईना उपलब्ध आहेत. रविवार पेठेतील अशोक कुंभार, मनोहर कुंभार तसेच गडकर आळीतील पोपट कुंभार यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. तसेच अनेक विक्रेत्यांनी पेणवरूनही शाडूच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत. सहा इंचापासून ते सुमारे चार फुटांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती साधारण ६०० रुपयांपासून पुढे आहेत. याबाबत अशोक कुंभार म्हणाले, ‘शाडूच्या मूर्ती तयार करण्यास जास्त वेळ लागतो. त्या वाळतही लवकर नाहीत. तसेच या मूर्तींचे काम बरेचसे हाताने करावे लागते. यासाठी साचे फारसे उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे साधारण एक मूर्ती तयार करण्यास सुमारे तीन ते चार दिवस लागतात.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav Ganpati Murti Shadu Soil POP