घरगुती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

महापुराच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी घरगुती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीला आता प्रारंभ झाला आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून गौराई व शंकरोबाच्या मुखवट्यांचे स्टॉलही सज्ज झाले आहेत.

कोल्हापूर - महापुराच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी घरगुती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीला आता प्रारंभ झाला आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून गौराई व शंकरोबाच्या मुखवट्यांचे स्टॉलही सज्ज झाले आहेत. 

दरम्यान, विविध आकारातील मखरे, सिंहासने, पाना-फुलांच्या माळांबरोबरच विविधरंगी लाईटच्या माळाही बाजारपेठेत उपलब्ध आहेत. गणेशोत्सव आता केवळ दहा दिवसावर आला आहे. महाव्दार रोड, पापाची तिकटी, राजारामपुरी परिसरात सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल सजले आहेत. इकोफ्रेंडली सजावटीचे साहित्यही या ठिकाणी उपलब्ध आहे. कापडी व लाकडी मखरांबरोबरच प्लास्टिकच्या तोरणाला पर्याय म्हणून झालरीचे कापडी तोरण, मोगरा, निशिगंध, गुलाब, झेंडू, जास्वंदीच्या कापडी फुलांचे हारही बाजारात उपलब्ध आहेत. अगदी शंभर रूपयांपासून ते अडीच हजार रूपयांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत. मोत्यांच्या हारांतही असंख्य व्हरायटी असून चाळीस रुपयांपासून ते उपलब्ध आहेत. 

चंदेरी झळाळी...
गणेशोत्सवात चांदीच्या अलंकाराची मागणी यंदाही वाढणार आहे. चांदीची फुले, दुर्वा, मोदक, कंठ्या, कड्या, तोडे, विविध प्रकारची फळे, उंदीर, सोंडपट्ट्या, भिकबाळी, त्रिशूल, डमरू, विविध प्रकारच्या माळा आदी विविध अलंकार व चांदीच्या वस्तू तयार करण्यासाठी कारागिरांच्या रात्री जागू लागल्या आहेत. अगदी शंभर-सव्वाशे रुपयांपासून ते दहा ते पंधरा हजारांपर्यंत चांदीची आभूषणे आणि सजावटीचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याचे प्रमोद लोहार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav Ganpati Preparation Kolhapur Market