गणेशोत्सव रंगणार सौरऊर्जेवर

सुधाकर काशीद
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - गणेशोत्सवात लखलखाट तर आहे आणि विजेचा खर्च मात्र शून्य आहे... साहजिकच मनात प्रश्‍न येतो हे कसे काय आहे; पण कोल्हापुरातील तरुणांनी हे शक्‍य करून दाखवले आहे आणि संपूर्ण गणेशोत्सव सौरऊर्जेवर साजरा करण्यासाठी तरुणांची फळी राबते आहे.

गणेशोत्सव म्हणजे केवळ जल्लोष आणि झगमगाट नव्हे, तर गणेशोत्सव म्हणजे नावीन्याची कास आणि कल्पकतेची सांगड असते. हे ही तरुण मंडळी वास्तवात उतरवून दाखवणार आहेत. जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळ या वर्षी गणेशोत्सवात सौरऊर्जेचा वापर करून एक वेगळेपण निर्माण करणार आहे.

परिसरात शेकडो आकाशकंदिलांची सजावट असणार आहे आणि या सर्व आकाशकंदिलाला सौरऊर्जेच्या तंत्राची जोड असणार आहे. त्याहून वेगळेपण असे की गल्लीतली सर्व लहान-मोठी मंडळी या आकाशकंदिलाच्या सजावटीत गुंतली आहेत. घरातील प्लास्टिकची बरणी, सजावटीची झालर, गोंडे, शाळकरी मुलांच्या रंगपेटीतील रंग, रंगबीरंगी चकत्या याचा वापर असल्याने खर्च शून्य असणार आहे. गणेशोत्सवातील वायफळ खर्च कमी करण्याचे आवाहन खूप जण करतात; पण वास्तवात ते होत नाही. विजेचा खर्च तर खूप होतो. त्यामुळे या वर्षी या मंडळाने स्वतःपासूनच विजेचा खर्च कमी करण्याचे नियोजन केले व गणेशोत्सव सौरऊर्जेवर करायचे ठरवले.

या तरुणांची धडपड पाहून जयसिंगपूरच्या रिन्युग्रीन कंपनीने मंडपाचे छतच सौर पॅनेलचे उभारण्याची तयारी दर्शवली. शिवाय सजावटीसाठी सौरऊर्जेची उपकरणे पुरवली. मात्र, त्यासाठी स्वतः कार्यकर्त्यांनी राबले पाहिजे, अशी अट घातली. अर्थात सौरऊर्जेचे महत्त्व पटावे, यासाठी ही अट होती. त्यानुसार गेले पंधरा दिवस मंडळाचे कार्यकर्ते सौर ऊर्जेतून सजावट करण्यासाठी राबत आहेत. थोडी अडचण अशी की पावसामुळे उन्हाचा सध्या अभाव आहे.

राबणारे हात
अभिरथ गायकवाड, आकाश काळे, कुमार डांगे, अनिश चेने, सुजय डांगे, समर्थ पाटील, मेघराज पाटील, विजय बंगडे, दीपक देसाई, गणेश पाटील, प्रवीण डांगे, ऋतुराज चेने, गणेश कापसे, कुणाल कोठावळे, मानसिंग चित्रुक, रविकिरण डांगे, अभिषेक हांडे हे कार्यकर्ते या उपक्रमासाठी राबत आहेत.

गणेशोत्सव जरूर आनंदाचा सण आहे; पण त्यात वायफळ खर्च नको इतका होतो. म्हणून आम्ही सौरऊर्जेचा आधार यावर्षी घेतला. इतरांनीही असा प्रयत्न करावा.
- दीपक देसाई (कार्यकर्ते)

Web Title: Ganeshotsav Solar Power decoration