सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ उद्या जिल्हा बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

सांगली - माळवाडी (भिलवडी) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी (ता.10) जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या (ता. 9) सायंकाळी शहरातून कॅंडल मार्च काढण्यात येणार आहे. या प्रकरणातील संशयित नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात येणार आहे. 

सांगली - माळवाडी (भिलवडी) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी (ता.10) जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या (ता. 9) सायंकाळी शहरातून कॅंडल मार्च काढण्यात येणार आहे. या प्रकरणातील संशयित नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात येणार आहे. 

माळवाडी (भिलवडी) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याघटनेबाबत जिल्ह्यासह राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.10) जिल्हा बंद ठेवण्याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निर्णय घेण्यात आला. या दिवशी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनाही दुपारी 12 वाजता पाच मुली निवेदन देतील, अशी माहिती संयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. अत्यावश्‍यक सेवा वगळता जिल्ह्यात बंद पाळला जाईल. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, उद्योजक, कॉलेज, थिएटर्स तसेच इतर घटकांनी सहभागी व्हावे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने बंद शांततेने पाळावा, असे आवाहन करण्यात आले. 

अफवेला बळी पडू नका 
बलात्काराच्या या घटनेबाबत समाजकंटक जातीच्या नावावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बळी पडू नका. असे कुणी करत असेल तर तातडीने पोलिसांना कळवा, असेही आवाहन संयोजकांनी केले. 

आज कॅंडल मार्च 
या घटनेच्या निषेधार्थ उद्या (ता.9) सायंकाळी 6 वाजता कॅंडल मार्चचे आयोजन केले आहे. स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापासून कॅंडल मार्च सुरू होईल. तर सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मारुती चौकातील पुतळ्याजवळ होणार आहे. 

नियोजनावर आज बैठक 

जिल्हा बंदच्या नियोजनासाठी उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता मिरज रोडवरील रणजित एम्पायरमधील मराठा क्रांती मोर्चा कार्यालयात सर्व गावांतील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. 
डॉ. संजय पाटील, विलास देसाई, श्रीरंग पाटील, रणजित जाधव, संभाजी पोळ यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते. 

परदेशी महिलेस न्याय 
...इतरांना वेगळा का ? 

कोपर्डीच्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात मोठे मोर्चे निघूनही असे प्रकार घडतच आहेत. या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काही महिन्यांपूर्वी एका परदेशी महिलेबाबत असाच प्रकार घडला. त्यावेळी तातडीने निकाल देण्यात आला. मात्र राज्यात अशा घटना घडत असताना त्याला विलंब केला जात आहे. परदेशी महिलेस एक न्याय आणि इतरांना वेगळा का? असा सवाल महिला आघाडीच्या आशा पाटील, कविता बोंद्रे यांनी केला. 

जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी भिलवडी येथे मुलीच्या घरी जाऊन नातेवाइकांची भेट घेतली. सांगलीसारख्या पुरोगामी जिल्ह्यात अशा घटना घडणे लांच्छनास्पद आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केल्याचे आशा पाटील यांनी सांगितले.

Web Title: gang rape protest District closed tomorrow