सांगलीत खाकी वर्दीतले गँगवॉर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सांगली / जयसिंगपूर : येथील शहर ठाण्यातील दोन पोलिस आणि त्यांचे समर्थक गुंडांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुंबळ हाणामारी झाली. अंकली आणि उदगाव हद्दीत तलवारी, चाकू, काठ्यांसह पोलिस व त्यांच्या गुंडांची फौज एकमेकांवर तुटून पडली. "बॉलिवूड स्टाइल' मोटारीतून अपहरण, पाठलाग आणि हाणामारी असा थरार येथे दिसून आला. हल्ल्यात संतोष पाटील व किरण पुजारी या दोन पोलिसांसह तिघेजण गंभीर तर चौघेजण किरकोळ जखमी झाले.

सांगली / जयसिंगपूर : येथील शहर ठाण्यातील दोन पोलिस आणि त्यांचे समर्थक गुंडांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुंबळ हाणामारी झाली. अंकली आणि उदगाव हद्दीत तलवारी, चाकू, काठ्यांसह पोलिस व त्यांच्या गुंडांची फौज एकमेकांवर तुटून पडली. "बॉलिवूड स्टाइल' मोटारीतून अपहरण, पाठलाग आणि हाणामारी असा थरार येथे दिसून आला. हल्ल्यात संतोष पाटील व किरण पुजारी या दोन पोलिसांसह तिघेजण गंभीर तर चौघेजण किरकोळ जखमी झाले.

येथील सांगली शहर पोलिस ठाण्यातील पाटील व पुजारी या दोन पोलिसांच्यात गेले काही दिवस सुरू असलेला वाद सोमवारी मध्यरात्री उफाळून आला. अंकली (ता. मिरज) व उदगाव (ता. शिरोळ) येथील पाटील व पुजारीच्या समर्थक गुंडामध्ये जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी सांगली ग्रामीण व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण, आर्म ऍक्‍टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खाकी वर्दीतील गुंड आणि गुंड साथीदारांच्या हाणामारीमुळे जिल्ह्याच्या वेशीवरच वर्दीची लक्तरे टांगली गेल्याचे चित्र दिसून आले.

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अरुण आनंदराव हातंगळे (वय 25, ऐंशी फुटी रस्ता, विश्रामबाग) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस शिपाई किरण राजाराम पुजारी (वय 28, उदगाव, ता. शिरोळ), राजाराम बाळू पुजारी (वय 53, उदगाव), रोहित सतीश पाटील (वय 19, उत्तर शिवाजीनगर, सांगली), ओंकार पोपटराव मगदूम (वय 19, गावभाग, सांगली), ओंकार दिलीप माने (वय 23, राजवाडा परिसर, सांगली), सुरेश ऊर्फ दादू सोमनाथ बंडगर (वय 26, उदगाव) यांना अटक केली. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, तर सागर पुजारी हा फरारी आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई किरण पुजारी याने आज सकाळी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस शिपाई संतोष पाटील, सचिन डोंगरे, अरुण हातंगळे, रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ गोट्या कोलप, महेश नाईक आणि अनोळखी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या संतोष पाटील व किरण पुजारी यांच्यात गेल्या चार-पाच महिन्यांपासून वाद धुमसत आहे. आर्थिक आणि अन्य कारणातून हा वाद निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांना वादाची माहिती होती. तीन महिन्यांपूर्वी पुजारी याची स्कार्पिओ मोटार (एमएच 10 एस 4) उदगाव येथे पेटवल्याचा प्रकार घडला होता. मोटार संतोष आणि त्याचे साथीदार सचिन डोंगरे, अरुण हातंगळे, दत्ता झांबरे यांनी पेटवली असल्याचा पुजारीला संशय होता. त्यातून दोघांमधील वाद धुमसत होता. चार दिवसांपूर्वी संतोष आणि पुजारी समोरासमोर आल्यानंतर पुन्हा वाद झाला होता. काल रात्री साडे अकराच्या सुमारास संतोषचे साथीदार हातंगळे व झांबरे हे अंकली येथे थांबले होते. पुजारी व साथीदारांनी त्यांना पाहिल्यानंतर ते तेथे आले. दोघांना घेरून हल्ला चढवला. हातंगळेच्या डोक्‍यात तलवार मारली, तर झांबरेला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांना उदगाव येथे नेले.

हातंगळेला उदगाव येथे नेल्याची माहिती पोलिस संतोषला समजली. त्यामुळे तो आणि साथीदार शेवरोले बीटस्‌ मोटार व इनोव्हा मोटारीतून उदगावकडे निघाले. उदगावला जोग फार्म हाऊसजवळ पुजारी व मित्र रोहित पाटील, सुहास बंडगर दुचाकीवरून जाताना दिसले. मोटारीने दुचाकीला धडक दिल्यामुळे तिघेजण खाली पडले. तेव्हा दोन्ही मोटारीतून संतोष व गुंड साथीदार खाली उतरले. पुजारीच्या पाठीत काठीने मारले. रोहितच्या डाव्या हाताच्या मनगटावर संतोषने चाकूने वार केला, तर बंडगरला देखील काठीने मारून जखमी केले. त्यानंतर मोटारी पुजारीच्या घराकडे वळवल्या. पुजारीचा भाऊ सागर व वडील राजाराम यांना शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी व काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर जखमी हातंगळेला घेऊन सर्वजण सांगलीकडे निघाले.

हाणामारीत पोलिस किरण पुजारी, भाऊ सागर, वडील राजाराम व मित्र रोहित, सुहास असे पाचजण जखमी झाले. तर दुसऱ्या गटात पोलिस संतोषचे मित्र हातंगळे, झांबरे जखमी झाले. हातंगळे याने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात, तर किरण पुजारीने जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ग्रामीण पोलिसांनी सहा जणांना अटक केली, तर पुजारीची स्कार्पिओ मोटार (एमएच 10 एस 4) जप्त केली आहे. दोघांना ताब्यात घेतले, तर जयसिंगपूर पोलिसांनी संतोष, झांबरे या दोघांना अटक केली आहे.

या गुंडांना बडतर्फच करा...!
आजवर वाढत्या गुन्हेगारीबद्दल खूप गंभीर चर्चा झाली आहे. मात्र आता पोलिसच गुन्हेगारांप्रमाणे वर्तन करू लागल्याने यंत्रणाच अपयशी ठरली आहे. गुंडाच्या मदतीने गँगवॉर करण्याचे धैय सहजासहजी येत नाही. पोलिस यंत्रणेत गुंडगिरी मुरल्यानेच हे शक्‍य आहे. या प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी वरिष्ठांनी या गुन्हेगारांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. शिपाई संतोष पाटील व किरण पुजारी यांनी गुंडांच्या साथीने तलवारी, चाकूसह हाणामारी केल्यामुळे दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत. दोघांवरील कारवाईचा अहवाल पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना पाठवला जाणार आहे. त्यामुळे दोघांवर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते.

Web Title: gangwar among police groups in sangli