मिरजेत गांजाची राजरोस जोमात आवक...

मिरजेत गांजाची राजरोस जोमात आवक...

कर्नाटक, जत तालुक्‍यातून पुरवठा - व्यसनींमध्ये तरुणांचा भरणा अधिक

मिरज - शहरातील उरुसानिमित्त आलेल्या भाविकांना लुटण्यासाठी कर्नाटकासह अन्य प्रांतातील गांजा विकणारी गुन्हेगारांची मोठी टोळी शहरात दाखल झाली आहे. या टोळीस गांजा पुरवणारे मोठे रॅकेटही सध्या सक्रिय झाले आहे. पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ऐन उरुसातील या गांजा तस्करीचा मोठा त्रास उरुसात येणाऱ्या लाखो भाविकांना होतो आहे. याच गांजाखसांकडून होणाऱ्या चोऱ्या ही सर्वांचीच मोठी डोकेदुखी बनली आहे. दर्गा परिसरापासून ते स्टॅंड, स्टेशन परिसरात गांजा विकणाऱ्या लोकांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

मिरज शहरात उरुसानिमित्त मोठ्या संख्येने कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानसह उत्तर प्रदेशपर्यंत लाखो भाविक शहरात दाखल होत आहेत. दर्गा परिसरातील संगीत महोत्सवानिमित्त शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकांरासह, रसिकांची मांदियाळीच जमते. शनिवारपासून मानाच्या गलेफाच्या मिरवणुकाही मोठ्या प्रमाणात निघतात. मोठ्या उंचीचे पाळणे, मेरी गो राऊंड, संसार उपयोगी साहित्यापासून ते लहान- मोठ्यांच्या खेळण्यांपर्यंतचे हजारो विक्रेते आणि त्यासाठीच्या खरेदीदारांची मोठी गर्दी यावेळी झालेली असते. पण याच गर्दीला गेल्या काही वर्षांपासून भुरट्या चोऱ्यांचे गालबोट लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून उरुसामध्ये गांजा, चरसचे सेवन करणाऱ्या व्यसनी लोकांच्या टोळ्याही या उरुसानिमित्त शहरात घुसत आहेत. बहुतांश भिक्षेकऱ्याच्या वेशात गांजा ओढणाऱ्या व्यसनी लोकांनी सध्या दर्गा परिसरातच ठाण मांडले  आहे. 

हरा माल, काला माल, इधरका उधरका 
शहरातील विशिष्ट परिसरात चालणाऱ्या गांजाच्या तस्करीमध्ये सांकेतिक भाषा वापरली जाते. यामध्ये गांजाला ‘हरा माल’ तर चरससाठी ‘काला माल’ आणि स्थानिक मालाला म्हणजेच सांगली, कोल्हापुरातील गांजाला ‘इधर’ का तर कर्नाटकासह अन्य राज्यांतील गांजाला ‘उधर’का असे संबोधले जाते.

व्यसन करून चोरी
एकदा गांजा ओढलेली व्यसनी व्यक्ती ही किमान दहा तास तरी त्याच्या अमलाखाली राहते. त्यानंतर त्याला नशेसाठी गांजाची आवश्‍यकता वाटते तेव्हा ही व्यसनी व्यक्ती त्यासाठी उरुसाच्या गर्दीत जाऊन पाकीटमारी, दागिने चोरीसह किरकोळ छोट्या मोठ्या चोऱ्याही करते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून उरुसातील चोऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. या रॅकेटची सगळी पाळेमुळे पोलिसांना ज्ञात आहेत तरीही त्याकडे होणारे दुर्लक्ष हे सोईस्करच आहे. 

दहा ग्रॅमची पुडी एक हजारपर्यंत
या सगळ्यांना गांजा आणि चरसचा पुरवठाही तितक्‍याच प्रमाणात होतो. यासाठीची आवक ही बहुतांश प्रमाणात कर्नाटकातून, तर काही प्रमाणात जत तालुक्‍यातून होते. गांजा विकणारी ही सगळी मंडळी प्रामुख्याने स्टॅंड रस्त्याकडेच्या झोपडपट्टीसह, फुटपाथ आणि काही प्रमाणात दर्ग्याच्या आवारातही राजरोसपणे धंदा करताना दिसतात. या टोळीकडून सध्या दहा ग्रॅम वजनाची  गांजाची पुडी अंदाजे पाचशे ते हजार रुपयांना विकली जाते आहे. त्यासाठी विशिष्ट कोडवर्डही या रॅकेटकडून वापरण्यात येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com