पैलवानांच्या हंबरड्यानी न्यू मोतीबाग तालीम हेलावली 

पैलवानांच्या हंबरड्यानी न्यू मोतीबाग तालीम हेलावली 

कोल्हापूर - जिथे वस्तादांचा आवाज घुमायचा..करडी नजर दिसली की मोठे मोठे पैलवानही आदराने माना खाली घालायचे. ती नजर आता पुन्हा कधीच दिसणार नव्हती. करड्या शिस्तीचे डोळे पहाण्याची सवय असणाऱ्या देशभरातील पैलवानांना हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे मिटलेले डोळे पहाणे असह्य झाले. कणखर असणाऱ्या पैलवानांनी फोडलेला हंबरड्याने अवघा भवानी मंडप व न्यू मोतीबाग तालमीचा परिसर हेलावून गेला. जोर बैठका, आणि पैलवानांच्या कुस्त्यांनी गजबजलेली तालीम सोमवारी(ता.17) काही काळ स्तब्ध झाली. 

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच रविवारी(ता.16) रात्रीपासूनच कोल्हापूरवर शोककळा पसरली. कुस्तीवर अपरंपार निष्ठा व करड्या शिस्तीचे गणपतराव वस्ताद आपल्यात नाहीत या कल्पनेने पैलवानांनी रात्र जागून काढली. वस्तादांच्या आठवणींनी पहाटे चारपासून सुरु होणारा व्यायामही झोकाळला. वाह रं. पट्या..ढेंग टाक, पकड..अशा सुरांनी पहाट अनुभवलेल्या पैलवांनाना सोमवारची पहाट आंदळकराच्या निधनाच्या बातमीने अस्वस्थ करुन गेली. पहाटेपासूनच आपल्या लाडक्‍या वस्तादाचे अखेरचे दर्शन घेण्यसाठी पैलवानांनी तालीम परिसरातच ठिय्या मांडला. चार ते पाच तासाच्या प्रतिक्षेनंतर ज्यावेळी शववाहिका आली त्यावेळी मात्र पैलवांनाचा रात्रीपासून संयमाने रोखून धरलेला धीर सुटला. झोकात येणारी वस्तांची स्वारी स्ट्रेचरवरुन आलेली पहाताच पैलवानांचे कणखर मनही अश्रूत डुंबून गेले. पार्थिवाच्या शेजारी ठेवण्यात आलेली गदा त्यांच्या कतृत्वाची साक्ष देत होती. प्रत्येक जण वस्तादांनी घडविलेल्या आपल्या शिस्तीबाबत बोलत होता. न्यू मोतीबाग तालमीच्या इमारतीसमोरच ऐटीत खुर्ची टाकून बसलेल्या हिंदकेसरींचे रुप म्हणजे जरबच. भवानी मंडपात येणारे भाविकही वस्तांदाकडे आदरयुक्त नजरेने पहायचे. त्यांचा आशिर्वाद घ्यायचे. ती खुर्ची ती जागा पोरकी झाली. भाविकांच्या प्रचंड गर्दीत असणारा भवानी मंडपाच्या परिसराने आज दु:खाचे हुंकार अनुभवले. वस्ताद गेल्यानंतरचे रितेपण प्रत्येक वयोगटातील पैलवान अनुभवत होता. अश्रूंना वाट करुन देत होता. सुमार एक तासभर न्यू मोतीबाग तालमीच्या परिसरात गणपतरावांची पार्थिव ठेवल्यानंतर शहरातील विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील मुख्य मार्गावरुन अंत्ययात्रा निघाली.

पार्थिव त्यांच्या मुळगावी पुनवत (ता. शिराळा) येथे अंत्यसस्कारासाठी नेण्यात आल्यानंतर न्यू मोतीबाग तालमी एकाकी पडल्याचाच भास होत होता.  

अंत्यदर्शनासाठी मोतीबाग तालमीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, कर्नाटक केसरी आप्पा बेळगावकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील सोनवडेकर, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, नगर केसरी सुभाष लोंढे, व्ही. बी. पाटील, आप्पा करजगे, आंध्र केसरी शंकर पैलवान, विजय सिंग, पांडुरंग पाटील-चिखलीकर, बाळू पाटील- कुडित्रेकर,  हिंदुराव घाटगे, श्रीपती म्हाकवेकर, महाराष्ट्र चॅम्पियन बाजीराव चौगुले, वस्ताद रसूल हनिफ, बी. टी. भोसले, माजी महापौर भिकशेठ पाटील व आर. के. पोवार, बांगडीबहाद्दर पी. जी. पाटील, रावसाहेब तनपुरे, दिलीप टोणपे, दुर्गासिंग लडू (हैदराबाद), नामदेव मोहिते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com