गणपतराव देशमुख विधानसभा लढणार नाहीत; लोक ठरवणार उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

शेकापचा उमेदवार ठरविण्यासाठी गावागावातील, वाड्यावस्त्यावरील कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जातील. आपण कोणाचेही नाव पुढे करणार नाही

सांगोला ः देशामध्ये 93 वर्षाची कोणतीही व्यक्ति निवडणूक लढवत नाही. माझेही वय झाले असून श्रवणदोष आहे. डोळ्यांनाही व्यवस्थित दिसत नाही. माझ्यानंतर योग्य उमेदवार देण्यापेक्षा माझ्या हयातीतच सक्षम उमेदवार देऊन त्यास विजयी करुन शेकापचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना आज केले. 

शेकापचा उमेदवार ठरविण्यासाठी गावागावातील, वाड्यावस्त्यावरील कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जातील. आपण कोणाचेही नाव पुढे करणार नाही. कार्यकर्ते जो उमेदवार देतील त्यास निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. 

1952 पासून सांगोला तालुक्‍यामध्ये शेतकरी कामगार पक्ष विधानसभेची निवडणूक लढवित आहे. 2019 ची निवडणूकही शेकाप पूर्ण ताकदीने लढविणार आहे. योग्य उमेदवार देऊन आम्ही जिंकणारच,असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार गणपतराव देशमुख यांनी स्वतःची उमेदवारी नसल्याचे स्पष्ट केल्याने शेकापचा उमेदवार कोण याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganpatrao deshmukh may not Contest Vidhansabha Election