हायटेक पद्धतीने होणार कचरा संकलन

डॅनियल काळे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

हायटेक कंट्रोल रूम
कचरा संकलनाची ही यंत्रणा अद्ययावत अशी आहे. एक हजार घरातील कचरा संकलन करणाऱ्या टिपरला जीपीएस सिस्टीम असेल. जीपीएस सिस्टीमबरोबरच टिपरच्या चालकाकडे वॉकीटॉकी देण्यात येतील. त्यामुळे कचरा संकलनाच्या सूचना या हायटेक कंट्रोल रूममधूनही दिल्या जातील. कोठे कचरा आहे काय आहे? याची संपूर्ण माहिती या हायटेक कंट्रोल रूममध्ये असणार आहे.

कोल्हापूर - महापालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा संकलन हायटेक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या ताफ्यात लवकरच नव्याने १०४ टिपर दाखल होणार आहेत. या टिपरना ‘जीपीएस’ सिस्टीम आहे. त्यामुळे कचरा संकलन कोणत्या भागातून कसे सुरू आहे. हे ट्रॅकिंग केले जाणारच आहे. याशिवाय प्रत्येक टिप्परच्या चालकाकडे वॉकीटॉकीही देण्यात येणार आहे. कचरा संकलनात इंदूर पॅटर्न करण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे. सध्या त्याची  तयारी या विभागात सुरू आहे.

शहरात दररोज सुमारे २५० टन कचरा संकलित होतो. हा कचरा महापालिका घंटागाडी, आरसी व्हॅन, डंपर यांच्या माध्यमातून संकलित करते. यासाठी महापलिकेकडे १२ आरसी व्हॅन असून, दीडशे सायकल रिक्षा आहे. प्रत्येक प्रभागात घरोघरी जाउन घंटागाडी कचरा संकलन करते. 

हा कचरा कंटेनरमध्ये एकत्र केला जातो. कंटेरनरमधील कचरा आरसी गाड्यांच्या माध्यमातून उचलून तो डंपिग ग्राउंडवर टाकला जातो. वर्षानुवर्षे ही पद्धत राबविली जाते, आता मात्र यात बदल केला जाणार आहे. 

स्वछ भारत योजनेत कोल्हापूरचे चांगले काम आहे. देशात एक नंबर येईल, या पद्धतीने काम करण्याची सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्याधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत. कचरा संकलन करताना कचरा वर्गीकरण करून कचरा संकलित केला जाणार आहे.
याशिवाय कचरा घरोघरी जाउन संकलित केला जाणार आहे. त्यासाठी १०४ टिपर (तीन चाकी रिक्षा) महापालिकेने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. या एका टिपरमार्फत दररोज एक हजार घरातील कचरा संकलित केला 
जाणार आहे.

दृष्टिक्षेपात...
शहरात रोज २५० टन कचरा संकलित
घंटागाडी, आरसी व्हॅन, डंपर, सायकल रिक्षा कचरा जमा
१०४ नवे टिपर येणार
टिपरना ‘जीपीएस’ सिस्टीम
कामाचे होणार ट्रॅकिंग
चालकांकडे वॉकीटॉकी

घंटागाडीत कचरा न टाकणाऱ्यांना दंड 
घंटागाडीत कचरा न टाकता इतरत्र कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. कचरा संकलनात अद्ययावत यंत्रणा आणतानाच नागरिकांनाही शिस्त लावण्यात येईल.

Web Title: Garbage Collection on Hitech Process