कचरा हटल्याने कुत्र्यांत २५ टक्के घट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

कऱ्हाड - शहरातील कचरा कोंडाळ्यांसह ५० कचरा टाकण्याची ठिकाणे हटवल्याने शहराच्या स्वच्छतेत तर भर पडली. त्याशिवाय त्या कचऱ्याच्या ढिगावर अन्नाच्या शोधार्थ येणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या २५ टक्‍क्‍यांनी घटली आहे. 

कऱ्हाड - शहरातील कचरा कोंडाळ्यांसह ५० कचरा टाकण्याची ठिकाणे हटवल्याने शहराच्या स्वच्छतेत तर भर पडली. त्याशिवाय त्या कचऱ्याच्या ढिगावर अन्नाच्या शोधार्थ येणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या २५ टक्‍क्‍यांनी घटली आहे. 

पालिकेने मागील वर्षापासून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आहे. त्यानुसार विविध उपक्रम पालिका राबवत आहे. तत्कालीन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या उपक्रमाचे परिणाम शहरात सकारात्मक दिसू लागले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर अशा कालावधीत श्री. वाटेगावकर यांनी चार महिन्यांत शहर कचऱ्याच्या कोंडाळ्यापासून मुक्त करण्याचे ध्येय ठेवले. त्यानुसार त्यांनी शहरातील ३० कचऱ्याची कोंडाळी आणि उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याची २० ठिकाणे निवडली. अर्थात ५० पेक्षा जास्त ठिकाणे होती. ती नंतर त्यांनी हळूहळू बदलून टाकली. मात्र, या ५० ठिकाणांवर शहरातील सर्वांत जास्त कचरा अनेक वर्षे पडत होता. ती कोंडाळी हटवणे म्हणजेच नागरिकांनाच अंगावर घेण्यासारखा प्रकार होता. मात्र, तरीही आरोग्य विभागाने तो धाडसी निर्णय घेतला. तेथे रांगोळ्या काढण्यास सुरवात केली. ते लोकांना भावले. त्यानंतर घंटागाड्यांची संख्या वाढवून ती शहरात फिरविण्यात आली. त्याची लोकांना सवय लागली. 

आरोग्य विभागाने घेतलेल्या त्या निर्णयाचे सकारात्मक पडसाद शहरात दिसत आहेत. कचरा कोंडळ्यावर अन्नाच्या शोधार्थ रात्रभर बसणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या आता दिसेनासा झाल्या आहेत. हिंसक बनणारी मोकाट कुत्रीच आता त्या भागात दिसेनासी झाली आहेत. वास्तविक तरीही मोकाट कुत्र्यांची संख्या अद्यापही जास्त आहे. मात्र, कचऱ्याची ठिकाणे हटल्याने किमान २५ टक्‍क्‍यांनी मोकाट कुत्र्यांची संख्या घटल्याचा पालिकेचा अभ्यास आहे. त्याबाबत त्यांनी अहवालही तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

कचऱ्याची ठिकाणे हटल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या घटली आहे. अन्नाचा शोध घेण्यासाठी ती शहरातून बाहेर पडल्याने ती संख्या घटली आहे. त्यामुळे स्वच्छता हाही त्यावर एक चांगला उपाय होवू शकतो, याची जाणीव पालिकेस झाली आहे. त्यामुळे तो निर्णय शहराला फायद्याचा ठरतो आहे.
- विजय वाटेगावकर, नगरसेवक व माजी आरोग्य सभापती 

Web Title: Garbage Dog