साथरोगाने आबालवृद्ध हैराण

हेमंत पवार
मंगळवार, 22 मे 2018

कऱ्हाड - वातावरणातील बदल, अचानक वाढलेली हवेतील उष्णता व दूषित पाण्यामुळे जिल्ह्यात साथरोगाची लागण वाढत आहे. त्यामुळे आबालवृद्धांना व्हायरल इन्फेक्‍शनने ग्रासले आहे. त्यामुळे शासकीय, खासगी रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढली आहे. दवाखाने सध्या रुग्णांनी फुल्ल आहेत. जिथे साथ उद्‌भवली आहे, तेथे आरोग्य विभागामार्फत उपचार व जनजागृतीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, व्हायरल इन्फेक्‍शनच्या रुग्णांची वाढलेली संख्या कमी होत नाही, असेच चित्र सध्या जिल्ह्यात आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून अंगाची लाहीलाही करणारा उकाडा आबालवृद्धांनी अनुभवला. त्यामुळे हवेतील उष्णता वाढली आहे. त्यातच दोन आठवड्यापासून ढगाळ वातावरण होत असल्याने उष्णता वाढू लागली आहे. जेथे वादळी पाऊस होते तेथे तात्पुरते वातावरण थंड होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी उकाडा बाधल्याने अनेक जण आजारी पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हवेतील उष्म्यामुळे आणि वातावरणातील बदलाने व्हायरल इन्फेक्‍शनचे अनेक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. ती संख्या गेल्या महिन्यांपासून वाढतच असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे शिवडे, साकुर्डी, चरेगाव, साप, पिरवाडी आदी ठिकाणी गॅस्ट्रोची साथ आली. त्यामुळे खळबळ उडाली होती. साकुर्डी येथे तर एका दिवसात सव्वाशेहून अधिक रुग्ण सापडल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. 

आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न करून व आरोग्य पथक संबंधित गावात २४ तास उपलब्ध ठेवून तेथील साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे साथ आटोक्‍यात येऊ लागली आहे. चिंचणेर वंदनजवळील पिरवाडी येथे कावीळची साथ आली होती. 

शुद्धीकरण नसल्यानेच साथ 
काही गावांचा अपवाद वगळता बहुतांश गावात यांत्रिक पद्धतीची पाणी शुद्धीकरण यंत्रणाच नाही. त्यामुळे लोकांना विहीर, नदी, बोअर किंवा अन्य स्तोत्रातून थेट पाणी टीसीएल टाकून पिण्यास दिले जाते. त्यात अनेकदा ते टीसीएल टाकलेही जात नाही, असे आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे. त्याचबरोबर टीसीएल टाकण्याचेही प्रमाण कमी- जास्त होत असल्यानेही दूषित पाणी लोकांना पिण्यास मिळते. त्यामुळे साथरोग पसरत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: gastro patient sickness