लक्ष्मीच्या पावलांनी गौराई आल्या घरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पारंपरिक पद्धतीने काशीळ (ता. सातारा) येथे महिलांनी गौराईचे स्वागत केले. 

सातारा  ः धनधान्य, सुख- समृद्धी लक्ष्मीच्या पावलांनी येण्याचे आवाहन करत आज घरोघरी महिलांनी गौराईचे स्वागत केले. रिमझिम पावसातही हळदी- कुंकवाच्या पायघड्यावरून गौराईला घरात आणत गौराईची महिलांनी विधिवत प्रतिष्ठापना केली. 
गणेशाच्या पाठोपाठ आज "आली का गौराई... कशाच्या पायी... लक्ष्मीच्या पायी....हळदी- कुंकवाच्या पायी..!' असे आवाहन करत गौराई विधिवत घरात आणण्यात आल्या. गौरीचा सण हा महिलांच्या जिव्हाळ्याचा सण. त्यामुळे सकाळपासूनच महिलांची गौरी आणण्यासाठी धांदल उडाली होती. जिल्ह्यात कालपासून पावसाने पुन्हा दमदार सुरवात केली आहे. आज सकाळपासूनही रिमझिम पाऊस पडत होता. पारंपरिक पद्धतीने कुमारिकेच्या हस्ते गौर घरात आणतात. प्रारंभी तिचे सुवासिनी औक्षण करतात. गौर घरात आणताना मार्गावर हळदी- कुंकवाचे हाताचे ठसे उमटवत सुवासिनी गौरीचे स्वागत करत घरात आणतात. त्यानंतरच गौरीची प्रतिष्ठापना केली जाते. आज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गौरी आगमानासाठी विविध मुहूर्त होते. मात्र, सकाळी अकरानंतरच बहुतेक महिलांनी गौरींची प्रतिष्ठापना केली. 

गेले काही दिवस गौरींच्या स्वागताची तयारी महिला करत होत्या. दागदागिन्यांच्या खरेदीपासून ते गौरीच्या फराळाच्या तयारीत महिला गुंतल्या होत्या. गौरी आगमनादिवशी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य केला जातो. त्यामुळे मंडईत शेपू- भोपळ्याची (पाने) भाजी मोठ्या प्रमाणावर विक्रीस आली होती. शेपूची एक पेंडी दहा रुपयांना विकली जात होती. गौरीला प्राधान्याने फुलांची वेणी घातली जाते. त्यामुळे शेवंतीच्या फुलांची वेणी आज 20 रुपयांना विकली जात होती. दुसऱ्या दिवशी गौरींना गोड नैवेद्य केला जातो. बहुतेक महिला पुरणपोळीचा बेत करतात, तसेच आपल्या ऐपतीप्रमाणे खाद्यपदार्थांची सजावटही केली जाते. त्यांची महिलांनी जय्यत तयारी केली गेली आहे. 

 

फुलांचे भाव वाढले 

सण म्हटले, की महिला मोगऱ्याचा गजरा आवर्जून केसात माळतात. महिलांचे सण म्हटले, की मोगऱ्याचे गजरे निश्‍चित महाग होतात. आज विथभर गजरा 15 ते 20 रुपयांना विकला जात होता. गौरीसाठी पिवळ्या शेवंतीची वेणी, तसेच विविध हारांच्या किमती आज तिप्पटीने वाढल्या होत्या. गौरीसाठीच्या हारांची किमती 20 रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gaurai came home to Lakshmi's footsteps