गडहिंग्लजच्या वेशीत गवे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

शहरालगत आलेले दोन्ही गवे वयाने कमी आहेत. अंदाजे दीड वर्षे वयाचे ते आहेत. कळपातून ते बाहेर पडलेले असणार. गवे शहरात येणार नाहीत, याची काळजी घेतली. हिरण्यकेशी नदीतून त्यांना हुसकावून जंगलाच्या दिशेने पाठविले आहे.
- अशोक कोरवी, वनपाल

गडहिंग्लज - कळपातून चुकलेल्या दोन गव्यांनी आज सकाळी गडहिंग्लज शहराच्या वेशीवर धडक मारली. शहरात प्रवेश करतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला त्यांना हुसकावण्यात यश आले. दोन्ही गवे हिरण्यकेशी नदीतून इंचनाळच्या दिशेने गेल्याने नदीकाठावर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहरालगत असणाऱ्या हिरण्यकेशी नदीत भडगाव पुलाजवळ आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन गवे पोहताना दिसले. त्यांचे वय अंदाजे दीड वर्षे आहे. बघता-बघता भडगाव पुलाजवळ नागरिकांचे गर्दी झाली. भडगावचे पोलिसपाटील उदय पुजारी यांनी ही माहिती वन विभागाला कळविली. 

त्यानंतर वन विभागाचे कर्मचारीही आले. मात्र लोकांच्या गर्दीमुळे बिथरलेले गवे गडहिंग्लजच्या बाजूला नदीकाठावर आले. गडहिंग्लज-चंदगड रस्ता ओलांडून पलीकडे गेले. लोकांची गर्दी, वाहनांच्या आवाजामुळे त्यांनी पश्‍चिमेच्या दिशेने धूम ठोकली. तेथून ते अयोध्यानगरातील बाळूमामा मंदिर परिसरात आले. 

गव्यांना हिरण्यकेशी नदीच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न सुरू होता. गवे पुन्हा पश्‍चिमेकडे गिजवणे येथील केदारलिंग मंदिर परिसरात आले. गवे मानवी वस्तीत येण्याचा धोका ओळखून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहराच्या बाजूने होत त्यांना नदीच्या दिशेला हुसकावले. त्यामुळे गवे पुन्हा बाळूमामा मंदिर परिसरात आले. तेथून गवे हिरण्यकेशी नदीपात्रात उतरले. पश्‍चिमेला इंचनाळच्या दिशेने गवे पोहत गेले. वन विभागाने खबरदारी म्हणून त्यांच्या मागावर कर्मचारी तैनात केले आहेत. नदीकाठावरील शेतकऱ्यांसाठी दक्षतेचा इशारा दिला आहे.

शहरालगत आलेले दोन्ही गवे वयाने कमी आहेत. अंदाजे दीड वर्षे वयाचे ते आहेत. कळपातून ते बाहेर पडलेले असणार. गवे शहरात येणार नाहीत, याची काळजी घेतली. हिरण्यकेशी नदीतून त्यांना हुसकावून जंगलाच्या दिशेने पाठविले आहे.
- अशोक कोरवी,
वनपाल

Web Title: Gava seen near Gadhinglaj city