पन्हाळा परिसरात गव्यांचा वावर (व्हिडिआे)

पन्हाळा परिसरात गव्यांचा  वावर (व्हिडिआे)

पन्हाळा - रेडेघाटीतील दोन्ही विहिरींना भरपूर पाणी आहे. मार्तंड, पावनगड, निकमवाडी परिसरात भरपूर गवत, झाडे-झुडपे आहेत. दक्षिण बाजूला दगडकपारी आहे. साहजिकच पन्हाळा परिसरात आलेला १३ ते १४ गव्यांचा कळप गेल्या तीन महिन्यांपासून येथेच विसावला आहे. एवढेच काय लहान पिल्लांच्या स्वरूपात त्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

पन्हाळा आणि पावनगड यामधला मार्तंड परिसर हा वनखात्याच्या अखत्यारीतील आहे. परिसरात जंगल बऱ्यापैकी वाढले असून, पावसामुळे बऱ्याच ठिकाणी हिरवळ आहे. गवत आणि ठिकठिकाणी पाण्याची सोय आहे. साहजिकच जंगली प्राण्यांचे वास्तव्य या ठिकाणी आहे.

विविध जातींच्या पक्ष्यांबरोबरच ससे, साळिंदर, डुक्‍कर, बिबटे, वानरे यांचे वास्तव्य येथे असल्याने चोरतोड थांबली आहे. परिसरात भरपूर औषधी वनस्पती आहेत. पर्यटकांना निसर्गसौंदर्य, प्राणी, पक्षी यांचे दर्शन घडण्यासाठी येथे बांधण्यात येणारा मनोरा, पक्षी उद्यान कल्पना कागदावरच आहेत. 

रेडेघाटीतील रोपवाटिकेची वाट लागली आहे, असे असले तरी परिसरातील जमीन मुरमाड आणि शाडूची असल्याने जाळ्या झुडपांना येथे मर्यादा नाही. कायम हवेत थंडावा आहे, साहजिकच गव्यांना पोषक असे वातावरण असल्याने गव्यांनी हे आपले हक्‍काचे स्थान बनवले आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या खाद्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरच हे गवे आपले मुक्‍कामाचे ठिकाण कदाचित बदलतील.

खबरदार फोटो काढाल तर...
परवा गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान पावनगडच्या लगोडबंदबाबाच्या दर्ग्याकडे नेबापूरचे गोरख जमादार मित्रासमवेत दुचाकीवरून निघाले होते. रेडेघाट आणि मार्तंड परिसरातील चौकात त्यांना जाळीत एक गवा दिसला, मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करू लागले, तोपर्यंत दुसरा गवा त्यांच्या मागून आला आणि तो गाडी उलथून टाकणार तोच मित्राने आरे चल, चल गवा आलायss असे म्हणताच. त्यांनी गाडीला वेग दिला आणि तावडीतून निसटले. याच रस्त्यावरून परत येणाऱ्या दुचाकीस्वारांनाही त्यांनी धोक्‍याची जाणीव करून दिली आणि थोड्यावेळाने सर्वांनी परत फिरणे पसंत केले.

आमच्या परिसरात गवे आहेत, त्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. येता-जाता नजरेस गवे पडतात, पण थोडावेळ थांबून ते निघून जातात. तरीही एकट्या दुकट्याने पावनगडावर चालत येणे धोक्‍याचे आहे. गव्याचा अंदाज घेतच ये-जा 
करावे लागते.
- आयूब मुजावर,
पावनगड

पन्हाळा ते पावनगड परिसरात १०-१५ गवे आहेत. ते आपल्या अधिवासात आहेत. या परिसरात पाणी, चारा आहे. तोपर्यंत ते येथे थांबतील खाद्य कमी झाले की ते जातील. लोकांनी घाबरू नये. 
- सुधीर सोनवणे, 

परिक्षेत्र वनाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com