पदाच्या तुकड्यावर समाधान न मानता रस्त्यावर उतरा

पदाच्या तुकड्यावर समाधान न मानता रस्त्यावर उतरा

कोल्हापूर - आमदार, खासदारकीच्या तुकड्यावर समाधान न मानता मराठा आरक्षणासाठी व्यवस्था बदलण्याकरिता मराठा समाजाने संघटितपणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी गोलमेज परिषदेत केले. आमदार नितेश राणे यांनी आरक्षणाच्य विरोधात सरकार असल्यामुळे आरक्षण मिळेल अशी अपेक्षा कोणी करू नये, लढ्याला मराठा समाजाने तयार राहावे, असे आवाहन केले.

मराठा आरक्षण तसेच समाजाच्या अन्य प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी योग्य दिशा देण्याकरिता राज्यातील पंधरा मराठा संघटनांची पहिली गोलमेज परिषद रेसिडेन्सी क्‍लबमध्ये घेण्यात आली. या परिषदेस अनेक तज्ज्ञ सहभागी झाले होते. साधारणपणे पाच तास ही परिषद चालली.

प्रवीण गायकवाड म्हणाले, ""मराठा आरक्षणाच्या जिवावर काही आमदार, खासदार झाले, पण मराठा समाजाचे पुढे काय? सध्या भांडवलशाही व ब्राह्मणशाहीचे व्यवस्था आहे. ही व्यवस्था बदलण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी विचाराची मोठ बांधून रस्त्यावर उतरले पाहिजे त्याशिवाय आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार नाही. आमदार, खासदारकीच्या तुकडा टाकल्यामुळे हा प्रश्‍न सुटणार नाही. राज्यातील आणि केंद्रातील सरकारमधील सत्ताधारी आणि विरोधक संगनमताने राजकारभार करत आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे. यासाठी आरक्षणाचे आंदोलन आपल्याला याहीपुढे सुरूच ठेवले पाहिजे.‘‘

आमदार नितेश राणे म्हणाले, ""संघाच्या आदेशानुसार सरकारमधील टाचणीही हालत नाही. त्यामुळे आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांकडून आरक्षणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. नौटंकी करणाऱ्या या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे. काही आमदार झाले. आताच एक खासदार झाले. त्यांनी खासदार झाल्यानंतर सहा महिन्यांत आपण मराठा आरक्षणाचा विषय अजेंड्यावर घेऊन काम करणार असल्याचे सांगावयास हवे होते.‘‘

कामाजी पवार म्हणाले, ""पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केलेले मराठा सेवा संघाचे कामाची व्याप्ती आता वाढली असल्याचे आजच्या परिषदेवरून दिसून येते.‘‘
उदय गायकवाड म्हणाले, ""सह्याद्रीच्या कुशीतच मोठी धरणे झाली. यात मराठा समाजाच्या जमिनी गेल्या. त्याच्या पुनर्वसनासाठीदेखील मराठा समाजाच्या जमिनी गेल्या त्यामुळे मराठा समाज लॅंडलेस झाला आहे. रघुनाथदादा पाटील म्हणाले, की शेतीमध्ये आजही मराठा समाज मोठा असल्याने शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास मराठा समाजाचे प्राबल्य पूर्वीप्रमाणे राहील.‘‘ दिलीप देसाई म्हणाले, ""मराठ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने बळकविल्या जातात. यात काही नालायक अधिकारी सामील आहेत. ही साखळी आपण मोडली पाहिजे.‘‘ बी. एच. पाटील म्हणाले, ""ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवून शेती घेणाऱ्यांविरुद्ध कडक कायदे करावेत.‘‘

अमरजित पाटील म्हणाले, की मराठ्यांचा इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे, त्याच प्रमाणे खोटा इतिहास शिकविण्याचे आणि लिहिण्याचे सुरू असेलेले काम प्रथम थांबविले पाहिजे. मराठी विश्‍वकोषामध्येही चुकीचा इतिहास मांडला जात आहे. त्याला विरोध केला पाहिजे. बाळासाहेब सराटे यांनी, चुकीचा इतिहास असलेल्या पुस्तकांवर बंदी घालावी, अशी मागणी केली. वसंतराव मोरे म्हणाले, मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणे आवश्‍यक आहे. चंद्रकांत जाधव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी, अशी मागणी केली. सागर आवटे यांनी शिवजयंती दिवशी मद्याची दुकाने बंद ठेवावीत, असे मत मांडले. विजय पाटील यांनी आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण रद्द करून पहिलीपासून गुणाची पद्धत सुरू करावी. ऍड. शिवाजी राणे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केसेस मोफत चालविल्या जातील, असे सांगितले. शशिकांत पवार यांचेही भाषण झाले.

चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, शांताराम कुंजी, संजू पाटील, मेजर जनरल काशीद, शंकर निकम, विजय पाटील आदींनीही आपली मते मांडली.

पत्रकार प्रताप आसबे यांनी मात्र मराठा आरक्षणासाठी केवळ मराठा समाजाला घेऊन चालणार नाही, तर त्यासाठी बहुजन समाजालादेखील सोबत घेण्याची आवश्‍यकता आहे. असे मत मांडले. ते म्हणाले, की आरक्षण म्हणजे गरिबी हटविण्याचा मार्ग नव्हे. आरक्षण मृगजळ आहे, त्यामुळे त्याच्या मागे खूप धावू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून मराठा समाजाने एकत्र यावे. सूत्रसंचालन इंद्रजित सावंत यांनी केले.

स्वागत सचिन तोडकर यांनी केले. प्रास्ताविक दिलीप पाटील यांनी केले. ठराववाचन वसंतराव मुळीक व इंद्रजित सावंत यांनी केले. शेत जमीन, इतिहासाची मांडणी, सांस्कृतिक ठेवण, शिक्षण आणि मराठा आरक्षण यावर आजच्या परिषदेत सविस्तर चर्चा झाली.

परिषदेस राजेंद्र कोंढरे, आर. जी. पाटील, ऍड. गुलाबराव घोरपडे, समीर काळे, संतोष गवाणे-पाटील, रामभाऊ गायकवाड, महेश सावंत, डॉ. प्रल्हाद केळवकर, डॉ. प्रताप वरुटे, डॉ. दिलीप जगताप, जयेश कदम, डॉ. हरीश पाटील, श्रीनिवास गायकवाड, विक्रांतसिंह कदम, सुरजित पवार, राजू लिंग्रस आदी उपस्थित होते.

शांताराम कुंजी यांनी भाषणात खासदार संभाजीराजे यांनी परिषदेस पाठिंबा असल्याचे कळविले आहे, असे सांगितले. हा धागा धरून प्रवीण गायकवाड म्हणाले, की कोणाला कधी आणि कसा निरोप द्यायचा हे आपल्या लोकांना चांगले कळते. कुंजी साहेबांनाच कसा निरोप आला बघा, म्हणताच उपस्थितात हशा पिकल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com