घरकुलांपासून ७०० कुटुंबे वंचित

Home
Home

सातारा - पत्र्याची गरमी, गळके छत, जमीन आणि भिंतीला आलेली ओल, सांडपाण्याच्या डबक्‍यांचा परिसर... अशा विचित्र वातावरणातून बाहेर पडण्यासाठी त्या कुटुंबांनी झोपड्या सोडल्या अन्‌ भाड्याच्या खोलीत राहायला गेले. वर्षा-दीड वर्षात पूर्ण होणारी घरकुले तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी पूर्ण होण्याची नाव काढेनात. काहींनी अर्धवट बांधलेल्या घरकुलात राहण्यास सुरवात केली आहे. शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील ७०० हून अधिक कुटुंबे हक्काच्या घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. 

केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणा योजनेंतर्गत साताऱ्यातील लक्ष्मीटेकडी, भीमाबाई आंबेडकरनगर, रामाचा गोट, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, मंगळवार पेठ, केसरकर पेठ (दोन ठिकाणी) अशा एकूण आठ ठिकाणी एक हजार ४७३ घरकुले व इतर पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. सुमारे ४६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम पुण्याची ‘बीव्हीजी’ ही कंपनी करत आहे. 

झोपडपट्टीवासीयांसाठी उभारण्यात येणाऱ्या संकुलात एका कुटुंबास २२५ चौरस फुटांचे एक घरकुल निव्वळ ३० हजार रुपयांत मिळते. पालिकेला ते एक लाख ९५ हजार रुपयांत पडणार आहे. यात प्रति घरकुल केंद्र शासन ८० हजार, राज्य शासन दहा हजार, म्हाडाचे अनुदान २५ हजार इतके असून, पालिकेला स्वत:चा हिस्सा प्रति घरकुल ५० हजार रुपये घालावा लागत आहे. शिवाय ३० हजार रुपये लाभार्थ्याचा हिस्सा असेल. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पालिकेवर सुमारे १२ कोटी रुपयांचा भार पडला आहे. 

ही योजना पूर्ण करण्यासाठी म्हाडाने मार्च २०१४  ही ‘डेडलाईन’ दिली होती. २०१२ मध्ये कामे सुरू झाली. टप्प्याटप्प्याने काम सुरू झाल्याने गेल्या पाच वर्षांत निम्मी म्हणजे ७०० घरकुलेही पूर्णत्वास गेलेली नाहीत. झोपडपट्टीच्या मूळ जागेवर घरकुलांचे संकुल उभारण्यात येत असल्याने झोपडीधारकाला जागा खाली करून द्यावी लागली. स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न साकार होणार असल्याने लाभार्थ्यांनी सहकार्य केले. यातील काहींनी बाजूला सरकून झोपड्या टाकल्या. परंतु, बहुतांश लाभार्थ्यांनी भाड्याने खोल्या घेतल्या. 
तीन वर्षे उलटूनही अद्याप त्यांना भाड्याच्या खोल्यांत राहावे लागत आहे.

केसरकर पेठेत दहा ते १२ कुटुंबांनी पालिकेच्या अर्धवट बांधलेल्या घरकुलांमध्येच संसार सुरू केले आहेत. पालिकेने या घरकुलांच्या कामांचा वेग वाढवावा आणि दिवाळीपूर्वी घरकुले पूर्ण करावीत, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे.

तीन वर्षांपासून रखडले काम
वीज नाही, शौचालय अर्धवट, घरकुलाला खिडक्‍या-दारे नाहीत, सांडपाण्याची व्यवस्था अपुरी... अशा अडचणींवर मात करत ही कुटुंबे दिवस ढकलत आहेत. पालिका म्हणते ‘आम्ही अजून ताबा दिला नाही, लोकांनी कामे पूर्ण झाल्याशिवाय तेथे राहायला जाऊ नये.’ ताबा दिला नाही, हे खरे असले तरी तीन-चार वर्षे झाली काम पूर्ण होईना. खोलीभाडे दोन-अडीच हजार रुपये आणि मासिक उत्पन्न पाच-आठ हजार अशी काही कुटुंबांची अवस्था आहे. या कुटुंबांची आर्थिक ओढाताण सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com