घोंगडी व्यवसायला अखेरची घरघर! 

घोंगडी व्यवसायला अखेरची घरघर! 

निरगुडी - हातमागाच्या साह्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता खर्च, कमी होणारी विक्री आणि अल्प किमतीतही बाजारपेठ न मिळणे या प्रमुख बाबी हा व्यवसाय धोक्‍यात येण्याची कारणे आहेत. घोंगडीचा वापर कमी झाल्यामुळे ग्राहकही घटले आहेत. 

जिल्ह्यात माण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात घोंगड्यांचे उत्पादन घेतले जाते. मेंढ्यांची लोकर स्वच्छ करून पिंजून घेतली जाते. त्यानंतर चरख्याने सूत काढले जाते. लोकर स्वच्छ करणे, सूत काढणे आदी कामे महिलाही करतात. मात्र, अलीकडे मागणी घटल्याने उत्पादनावरही परिणाम झालेला दिसतो. पूर्वी पावसात शेतीची कामे करताना उब मिळावी, म्हणून घोंगडीचा वापर केला जात होता. लग्न समारंभ, बैठकांसाठी प्रामुख्याने घोंगडीचाच वापर व्हायचा. घोंगड्यांना कोकणामध्ये अधिक मागणी होती आणि अजूनही बऱ्यापैकी ही मागणी टिकून आहे. पूर्वी घोंगडीबरोबर कांबळीही तयार होत होत्या. यापूर्वी घोंगडी सर्रास वापरली जायची. मात्र, गेल्या काही वर्षात चादर, चटई, गादी, रजई आदी प्रकार बाजारात आल्याने घोंगडी आपोआपच दुर्लक्षिली गेली. परंतु, डोंगराळ भागात काही प्रमाणात आजही घोंगड्यांचा वापर सुरू आहे. 

घोंगड्यांसाठी सध्या बाजारपेठ म्हणजे कोकणपट्टी, पश्‍चिम महाराष्ट्रातील इतर भागात तुरळक ठिकाणी विक्री होत आहे. ग्रामीण भागातच मागणी असल्याचे सध्या चित्र आहे. त्यात पंढरपूर आळंदी, महाड येथील मोठ्या यात्रेतून अजूनही घोंगड्यांची बऱ्यापैकी विक्री होते. याच बाजारपेठेवर हा व्यवसाय टिकलेला दिसून येतो. शहरी भागात मात्र ग्राहकांनी कारखान्यात तयार होणाऱ्या आकर्षक रंगाच्या चादरी स्वीकारल्या. त्यामुळेही मोठ्या बाजारपेठांत घोंगड्यांची मागणी घटली आहे. 

वाढत्या उत्पादन खर्चामुळे फायदा कमी 
घोंगडी तयार करणाऱ्यांची संख्या कमी होत असून लोकरीचा दरही वाढला आहे. विणकाम करण्यासाठी 800 ते 900 रुपये खर्च येतो. सध्या बाजारात एका घोंगडीची किंमत दीड हजार ते दोन हजार रुपये इतकी आहे. लोकरीचा पेळू तयार करणे, घोंगडी विणणे यासाठी 400 ते 500 रुपये खर्च होतात, त्यामुळे या व्यवसायात फारशी आर्थिक प्राप्ती होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com