सातारा जिल्ह्यात आले लागवड रखडली

विकास जाधव
शनिवार, 13 मे 2017

तापमानवाढीचा परिणाम; दर घसरल्‍याने क्षेत्र घटण्याची शक्‍यता 
काशीळ - तापमानवाढीचा परिणाम आले पिकावर होऊ लागला आहे. तापमानवाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणारी लागवड रखडली आहे. आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

तापमानवाढीचा परिणाम; दर घसरल्‍याने क्षेत्र घटण्याची शक्‍यता 
काशीळ - तापमानवाढीचा परिणाम आले पिकावर होऊ लागला आहे. तापमानवाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणारी लागवड रखडली आहे. आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आले पीक लागवडीत सातारा जिल्हा महत्त्वाची भूमिका बजावतो. जिल्ह्यात सुमारे १८०० ते २००० हेक्‍टर आल्याची लागवड होते. सातारी, औरंगाबादी, माहीम व मारन या जातीची आले पीक लागवड केली जाते. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून आल्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी आल्याचे दर प्रति गाडीस (५०० किलोची एक गाडी) ५० ते ५५ हजारांवर गेले होते. या काळात आले उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला होता. दरवाढीमुळे जिल्ह्यात आल्याच्या क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर टप्पाटप्प्याने आल्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ती घसरण आजही कायम आहे. 

सध्या आल्याचा दर प्रति गाडीस ४५०० ते ५००० रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. हा दर परवडणारा नसल्याने आले पिकांचे क्षेत्र शेतकऱ्यांकडून कमी केले जात आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आले पिकाची लागवड करण्याची परंपरा होती. मात्र, या काळात तापमानात मोठी वाढ होऊ लागली आहे. या तापमान वाढीत लागवड केली, तर उगवण चांगली न होण्याबरोबरच आले नासण्याची शक्‍यता असते. सध्या जिल्ह्यात ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आहे. हे तापमान आले लागवडीसाठी पोषक नाही. आले लागवडीसाठी ३५ अंश सेल्सिअसच्या आत तापमान पोषक ठरते. या तापमानात आल्याची उगवण चांगली होण्यास मदत होते. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडून आल्याचे क्षेत्र कमी केले जात असून, जिल्ह्यात १५०० हेक्‍टरच्या दरम्यान आल्याची लागवड होण्याचा अंदाज आहे. 

भांडवली खर्च निघेना 
सध्या आल्याच्या दरातील घसरण ही शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे. जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, सातारा तसेच काही प्रमाणात कऱ्हाड तालुक्‍यात आल्याची लागवड केली जाते. आले पिकास सध्याच्या बियाण्याच्या दर व ठिबक संचासह एकरी दीड ते पावणेदोन लाख रुपये भांडवली खर्च येतो. एकरी सरासरी ३० गाड्यांचे उत्पादन मिळते. सध्या प्रति गाडीस ४५०० ते ५००० रुपये दर मिळत असल्याने दीड लाख रुपये मिळत आहेत. या दरात भांडवली खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. यामुळे लागणीचे आले न काढता तसेच शेतजमिनीत ठेवले जात आहे. 

प्रक्रियेला चालना द्यावी 
गेल्या दोन वर्षांपासून आले पिकातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. उसाला पर्याय म्हणून आले पिकाकडे शेतकरी बघत आहे. दुष्काळी पट्ट्यात आल्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आल्यास चांगला दर मिळण्यासाठी आले पिकावर प्रक्रिया उद्योगास शासनस्तरावर चालना देणे आवश्‍यक आहे. तसेच प्रक्रिया उद्योगाला फायदेशीर ठरणारे आल्याचे वाण लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आवश्‍यक आहे. 

मी कायम आल्याचे पीक घेत आहे. दरातील घसरणीमुळे आठ ते दहा एकरांवर करत असलेली लागवड पाच ते सहा एकर या वर्षी करणार आहे. तापमान कमी होऊ लागल्यावर लागवड करणार आहे. 
- जयवंत पाटील, पाल, जि. सातारा 

सध्या तापमानात वाढ झाली असल्याने या काळात आले लागवड करू नये. ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यावर आल्याची लागवड चांगली होण्याबरोबरच उत्पादनही चांगले मिळते.
- भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव 

Web Title: ginger plantation stop