मुलींची १०० वसतिगृहे उभारू - राजकुमार बडोले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

खंडाळा - राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांतील एकही मुलगा- मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्य शासनाने १०० वसतिगृहे दिली आहेत. राज्यात आणखीन १०० वसतिगृहे देण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त शिरवळ (ता. खंडाळा) येथे १०० मुलींचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्याचे भूीमपूजन श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तालुका पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, जात पडताळणी समितीचे उपायुक्त रवींद्र कदम, तहसीलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दीपा बापट, शिरवळचे उपसरपंच सुनील देशमुख, भाजपचे अनुप सूर्यवंशी, गौतम कांबळे, सुनील घारे, मालन गिरीगोसावी, सरपंच निखिल झगडे आदी उपस्थित होते. या वसतिगृहाच्या माध्यमातून मुलींना निवासाची, जेवणाची, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे वसतिगृह शिरवळपासून थोड्या अंतरावर असल्याने रस्त्याचे अंदाजपत्रक सादर करावे, असेही श्री. बडोले यांनी यावेळी सांगितले.

प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी प्रास्ताविक केले. सहायक आयुक्त सचिन कवले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Girl 100 Hostel Rajkumar Badole