अनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी

भद्रेश भाटे
बुधवार, 16 जानेवारी 2019

वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले आहे. गावात मुलींची संख्या वाढली असून, ती मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ व मुली २९ आहेत. गाव १०० टक्के साक्षर झाले असल्याने गावाचा लौकिक वाढला आहे.  

वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले आहे. गावात मुलींची संख्या वाढली असून, ती मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ व मुली २९ आहेत. गाव १०० टक्के साक्षर झाले असल्याने गावाचा लौकिक वाढला आहे.  

बावधनलगत असलेल्या अनपटवाडी या छोट्या गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती मुंबईत नोकरी, कामाच्या निमित्ताने स्थिरावलेली आहे. १९९८ मध्ये मुंबईतील या चाकरमान्यांनी एकत्र येऊन श्री ग्रामविकास मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून मंडळातील प्रत्येक सभासदाकडून दरमहा ४० रुपये जमा करत गावाच्या विकासासाठी निधी उभा केला. या निधीतून तसेच गावाच्या यात्रेत जमलेल्या निधीतून गावात विकासकामे व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यातूनच सन २०१२ मध्ये गावाने देशातील झपाट्याने कमी होणाऱ्या मुलींच्या संख्येवर तसेच स्त्री भ्रूणहत्येवर मात करण्यासाठी गावात ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ नव्हे तर ‘लेक शिकवा’ हे अभियान हाती घेतले. त्यामध्ये गावात जन्माला येणाऱ्या मुलीचे स्वागत करून मुलीच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव बॅंकेत जमा करून ठेवपावती पालकांना सुपूर्त करण्यात येते.

त्यात श्री ग्रामविकास मंडळाचे योगदान मोठे आणि मोलाचे आहे. त्याचे परिणाम म्हणजे आज गावात मुलींची संख्या वाढली असून, मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ आणि मुली २९ आहेत. आज शंभर टक्के गाव साक्षर असून, गावातील सर्व मुलीच नव्हे तर गावात लग्न होऊन आलेल्या सुना यादेखील उच्चशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित आहेत. शिक्षिका, प्राध्यापिका, वकील, सी. ए., अभियंता अशा सर्वच क्षेत्रामध्ये या मुली गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी कार्यरत आहेत. प्रजासत्ताकदिनी झेंडा वंदनाचा मान गावाचे प्रथम नागरिक सरपंच यांना असतो. परंतु, मागील वर्षी ग्रामपंचायतीने हा मान शाळेतील आपल्या लेकीला दिला. प्राथमिक शाळेतील ध्वदवंदन आदर्श विद्यार्थिनीची घोड्यावरून मिरवणूक काढून तिच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या ‘लेकीसत्ताक’ प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या आदेशाचे गावाने तंतोतंत पालन करून नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.                 

एकीतून गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा ग्रामस्थांनी निर्माण केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने सन २०१० मध्ये ग्रामपंचायतीची संपूर्ण सत्ता महिलांच्या हातात देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती करून खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा सन्मान केला होता.

यावेळी सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, शिपाईदेखील महिलाच होत्या. त्यांनी पाच वर्षे अत्यंत नेटकेपणाने गावाचा कारभार करून विकासाची परंपरा कायम राखून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मान
दरम्यान, गावातील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. गावाला आदर्श सरपंच, पंचायत समितीचा यशवंत ग्रामपुरस्कार, इको व्हिलेज, जिल्हा परिषदेचा सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा वसंतराव नाईक विशेष पुरस्कार, राज्य शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निर्मलग्राम, स्वच्छ अंगणवाडी असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

Web Title: Girl Birth Rate Increase in Anpatwadi