सातारा जिल्ह्यात वाढतोय मुलींचा जन्मदर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

वर्षनिहाय मुलींचा वाढलेला जन्मदर
२०१२- १३ :     ९१५ 
२०१३-१४ :     ९१६ 
२०१४-१५ :     ९२३ 
२०१५-१६ :     ९२४ 
२०१६-१७ :     ९२०
२०१७-१८ :     ९२४ 
२०१८-१९ :     ९३३
(आकडेवारी - जिल्हा परिषद आरोग्य विभाग)

सातारा - जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जावळी, महाबळेश्‍वर, माण आणि पाटण तालुक्‍यांत  घटला आहे. या चार तालुक्‍यांत घटता मुलींचा जन्मदर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन स्त्री भ्रूणहत्येविरोधात आणखी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढत असून, २०१२-१३ मध्ये मुलींचा जन्मदर ९१५ होता तो  २०१८-१९ मध्ये तो वाढून ९३३ वर गेला आहे. 

‘मुलगी नको, मुलगाच हवा’ या एकमेव हट्टापायी मुला-मुलींच्या जन्मदराचे गणित बिघडले आहे. आजही खेडेगावात एक किंवा दोन मुली झाल्यावर ‘वंशाला दिवा’ हवा, हा समज कायम आहे. तर दुसरीकडे एकाच मुलीवर थांबणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पण, एकविसाव्या शतकात वाटचाल करताना ग्रामीण भागात आजही मुलीच्या जन्माचे स्वागत होताना दिसत नाही. एक, दोन मुली झाल्यावर तिसरा मुलगा व्हावा, यासाठी प्रयत्न करणारी कुटुंबे आजही पाहायला मिळतात. शासनाने कितीही कायदे केले तरी जोपर्यंत लोकांत जागृती होत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. नुकतीच जिल्हास्तरीय ‘टास्क फोर्स’ची बैठक जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये त्यांनी चार तालुक्‍यांत मुलींच्या घटलेल्या जन्मदरावर चिंता व्यक्त करून हा जन्मदर वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ कार्यक्रम राबविण्याची तसेच समाजात जागृती करण्याचीही सूचना केली.

जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३ आहे. पण, जावळी, महाबळेश्‍वर, माण आणि पाटण तालुक्‍यांत हा जन्मदर खाली आला आहे. जावळीत ७६५,  महाबळेश्‍वर ८१३, माण ८९०, पाटणमध्ये ८९६ आहे. मुलींचा कमी जन्मदर असलेल्या या तालुक्‍यांत जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. काही डोंगरी भागात आजही काही कुटुंबांत मुलगा हवा, अशीच मानसिकता पाहायला मिळते. तरीही सुनेला मुलगी झाली तर अख्खे कुटुंब दु:ख करत बसते. अशा कुटुंबांची जागृती करण्यास प्राधान्य द्यायला हवे. उर्वरित सात तालुक्‍यांत मात्र, मुलींचा जन्मदर चांगला आहे. यामध्ये (२०१८-१९ ची आकडेवारी) कऱ्हाड ९११, खंडाळा ९४४, खटाव ९०२, कोरेगाव ९७१, फलटण ९०४, कऱ्हाड ९९१, वाई ९१७ असा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Birthrate Increase in Satara District