तुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वीच घेतला प्रियसीचा जीव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

  • बोरगाव जवळच्या बोरगांववाडी कसनाळ रस्त्यालगत असलेल्या शेतात प्रेम प्रकरणातून युवतीचा डोक्यात रॉड घालून खून
  • अमृता अनिल कुंभार (२४, रा. जांभळी) असे तिचे नाव
  • बारवाड (ता. निपाणी) येथील युवक योगेश विलास चौगुले (२५ ) यांने दिली खूनाची कबुली. 

मांगूर- बोरगाव जवळच्या बोरगांववाडी कसनाळ रस्त्यालगत असलेल्या शेतात प्रेम प्रकरणातून युवतीचा डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला आहे. अमृता अनिल कुंभार (२४, रा. जांभळी, ता. शिरोळ ) असे तिचे नाव आहे. या खूनाची कबुली स्वतः बारवाड (ता. निपाणी) येथील युवक योगेश विलास चौगुले (२५ ) याने दिली. तुला शेवटचं भेटायचंय असे सांगून योगेशने तिला बाेलावून घेतले व तिचा खून केला. 

हा खुनाचा प्रकार शनिवार (ता. 27) घडला असून आज ही घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जांभळी ( ता. शिरोळ) येथील युवकाचे मामा प्रदिप बनगे यांच्याकडे बारवाड (ता. निपाणी) येथील योगेश विलास चौगुले रहात होता. वारंवार योगेशचा संपर्क जांभळीला असल्याने गेल्या पाच सहा वर्षांपासून त्याचे व अमृताचे प्रेम प्रकरण जुळले होते. पण सध्या या मुलीचे लग्न इस्लामपूर येथे ठरल्याने निराश झालेल्या योगेश याने अमृता हीला आपली शेवटचीच भेट असल्याचे सांगितले व बाहेर गांवी बोलावून घेतले. बोरगांववाडी नजीक असलेल्या शेतात शनिवारी अमृताच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. याची माहिती स्वतःहून निपाणी शहर पोलिसात मंगळवारी (ता. 30) सांयकाळी दिली. 

दरम्यान शनिवारी (ता. 27) अमृता घरी नसल्याने तिचे वडील अनिल कुंभार यांनी कुरुंदवाड पोलीसात फिर्याद नोंदविली होती.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Murdered in Nipani taluka