घरासमोर पेटवून दिलेल्या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू

सूर्यकांत वरकड 
गुरुवार, 29 मार्च 2018

आरोपींवर नातेवाइकांचा हल्ला 
आरोपींना अटक करून पोलिस ठाण्यात नेले जात असताना अश्‍विनीच्या नातेवाइकांनी त्यांना अडवून पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली. कर्जत येथे पोलिस उप अधीक्षकांच्या कार्यालयाजवळच सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

नगर : घरासमोर उभ्या असलेल्या तरुणीला दोन तरुणांनी पाठीमागून येऊन पेटवून दिले. कोरेगाव (ता. कर्जत) येथे शनिवारी (ता. 24) दुपारी झालेल्या या घटनेत गंभीर भाजलेल्या या तरुणीचा आज जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अश्‍विनी किसन कांबळे (वय 20) असे तिचे नाव असून, तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार कर्जत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश बारकू अडसूळ (वय 23), किशोर छगन अडसूळ (वय 28, दोघे रा. कोरेगाव, ता. कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत. 

अश्‍विनी शनिवारी दुपारी घरासमोर उभी असताना आरोपी शैलेश व किशोर पाठीमागून आले. घरामध्ये कोणी नसल्याचा अंदाज घेऊन त्यांनी तिच्या अंगावरील कपडे पेटवून दिले. त्यात ती गंभीर भाजली. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्यात तिने वरील माहिती दिली. त्यावरूनच कर्जत पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 25) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अश्‍विनीचा आज मृत्यू झाला. त्यामुळे कर्जत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले. 

दरम्यान, अश्‍विनीचा मृतदेह आज दुपारी कोरेगाव येथे नेला; मात्र आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा तिच्या नातेवाइकांनी घेतला. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र ते भूमिकेवर ठाम होते. नंतर कर्जत पोलिसांनी सायंकाळी आरोपी शैलेश व किशोर अडसूळ यांना अटक केली. 

कर्जतचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी सांगितले, की पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, केवळ भांडणे झाल्याने आरोपींनी तिला पेटविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिस गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहेत.

आरोपींवर नातेवाइकांचा हल्ला 
आरोपींना अटक करून पोलिस ठाण्यात नेले जात असताना अश्‍विनीच्या नातेवाइकांनी त्यांना अडवून पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली. कर्जत येथे पोलिस उप अधीक्षकांच्या कार्यालयाजवळच सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: girl set a blaze in Koregaon Nagar

टॅग्स