10 जागा द्या अन्यथा 50 जागा स्वबळावर लढवू; आघाडीला 'या' मित्रपक्षाचा इशारा

10 जागा द्या अन्यथा 50 जागा स्वबळावर लढवू; आघाडीला 'या' मित्रपक्षाचा इशारा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी सोपी राहिलेली नाही. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व दर्यापूर या दोन विधानसभा मतदारसंघांसह सोलापुरातील मोहोळ अथवा दक्षिण सोलापूरची जागा रिपाइंला (गवई गट) द्याव्यात, अशी मागणी केली आहे. आमच्या मागणीचा सन्मानपूर्वक विचार न केल्यास राज्यातील 50 जागा स्वबळावर लढवू, असा इशारा रिपाइंचे (गवई गट) राज्य सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी सोलापुरात दिला. 

वंचित बहूजन आघाडीला आघाडीसोबत घेण्याची गरज होती परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अतिविश्‍वास आघाडीला महागात पडला. लोकसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीचा सर्वाधिक फायदा भाजपलाच झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता आघाडीतील नेत्यांनी वंचित बहूजन आघाडीला सोबत घ्यावे. जेणेकरुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सोपे पडेल, असे डॉ. गवई म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विजयात दर्यापूर व अचलपूरसह अन्य मतदारसंघाचा मोठा वाटा होता. त्यामुळे आता आम्हाला दर्यापूर (बळवंत वानखेडे) व अचलपूर (डॉ. राजेंद्र गवई) या दोन जागा आघाडीने द्याव्यात. उर्वरित जागांबाबत एक पाऊल मागे घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जागांबाबत बैठक झाली असून आघाडीच्या निणर्याची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वंचितसाठी एक पाऊल मागे घेऊ 
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखण्याकरिता वंचित बहूजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसमवेत यावे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांना तसा निर्णय घेतल्यास आपण जागा वाटपात एक पाऊल मागे घेऊ, असे रिपाइं गवई गटाचे राज्य सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले. 

बॅलेट पेपरच व्हाव्यात निवडणुका 
पाच वर्षे केंद्रात सत्ता मिळालेल्या भाजपविरोधात लोकसभा निवडणुकीपूर्वी वातावरण होते. तरीही त्यांना एकतर्फी विजय मिळाला. या पार्श्‍वभूमीवर ईव्हीएमवर नुसती शंका उपस्थित करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी मोठा रेटा लावण्याची गरज आहे. कोणत्याही एका लहान पक्षाने अथवा गटाने तशी मागणी करुन चालणार नाही. सद्यस्थिती पाहता तो निर्णय होईल, असे वाटत नसल्याचेही डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com