गडहिंग्लजच्या विकासाला निधी देऊ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

गडहिंग्लज - शहरातील रस्ते, दलित वस्ती सुधारणा, सांस्कृतिक सभागृहासह विविध प्रश्‍नांसाठी विकासनिधी संदर्भात नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शहराच्या विकासाला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री श्री. पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिली. 

गडहिंग्लज - शहरातील रस्ते, दलित वस्ती सुधारणा, सांस्कृतिक सभागृहासह विविध प्रश्‍नांसाठी विकासनिधी संदर्भात नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शहराच्या विकासाला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री श्री. पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिली. 

गडहिंग्लज पालिकेत बहुमत मिळाले असले तरी जनता दलाने भाजप व शिवसेनेला सोबत घेवून सत्ता स्थापन केली आहे. शहरातील प्रलंबित महत्वाच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी सत्तारूढ आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. नुकताच सौ. कोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापुरातील विश्रामगृहावर श्री. पाटील यांची भेट घेतली. या भेटीत सौ. कोरी यांनी शहरातील विकासाचे प्रश्‍न मांडले. शहर विकास आराखड्यात बहुउद्देशिय सभागृहाचे आरक्षण आहे. परंतु निधीअभावी हे सांस्कृतिक सभागृह रखडले आहे. त्यासाठी पाच कोटींची गरज असल्याचे सौ. कोरी यांनी यावेळी सांगितले. शहरातील विविध रस्ते खराब झाले असून त्यासाठी रस्ते विकास निधीतून साडेतीन कोटीची मागणी केली आहे. दलित वस्ती नागरी सुधारणा योजनेतंर्गत 2 कोटी 40 लाखांची गरज असून हा निधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त करून इतर विविध विकासकामांसाठीही निधीची गरज असल्याचे सौ. कोरी यांनी सांगितले. 

माजी सैनिकांना घरफाळा माफ करण्याच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. परंतु, हा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवला जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. नगरपालिका जर घरफाळ्याची रक्कम सोसत असेल तर शासन पातळीवर तसा निर्णय घेता येणे शक्‍य असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. गडहिंग्लजच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याची ग्वाही देवून शहरातील अयोध्यानगरातील उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रणसुद्धा श्री. पाटील यांनी स्वीकारल्याचेही नगराध्यक्षा कोरी यांनी सांगितले. शिष्टमंडळात उपनगराध्यक्ष नितीन देसाई, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, वाचनालय समिती सभापती नरेंद्र भद्रापूर, दीपक कुराडे, गंगाधर हिरेमठ, महिला बालकल्याण समिती सभापती शशिकला पाटील, बांधकाम सभापती क्रांतीदेवी शिवणे, सुनिता पाटील,श्रद्धा शिंत्रे, विणा कापसे, माजी सैनिक रखमाना आपगे आदी उपस्थित होते.

Web Title: Give funds to the development of Gadhinglj