आरक्षण द्या किंवा घरी जा : माजी आमदार प्रकाश शेंडगे 

तात्या लांडगे
शनिवार, 12 मे 2018

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्याशिवाय अन्य मंत्री काहीच बोलत नाहीत. केवळ मंत्रिपदाच्या जोरावर त्यांना गप्प बसविले जात आहे. हे एकाधिकारशाहीचे सरकार घालविल्याशिवाय धनगर समाज स्वस्थ बसणार नाही.
- प्रकाश शेंडगे, आमदार

सोलापूर : धनगर व धनगड एकच आहेत, हे माहिती आहे. आम्हाला सत्ता द्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊन अनुसूचित समाजाच्या सवलती दिल्या जातील, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत 'ब्र' ही काढला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करुन आता आरक्षण देता की घरी जाता, असा जाब विचारण्याकरिता येत्या २२ मे रोजी मंत्रालयावर तब्बल ११ हजार ढोलकरी ढोल गर्जना आंदोलन करणार आहेत, अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोलापुरात बोलताना दिली.

'वापरा आणि फेका' अशी संस्कृती असलेल्या भाजप सरकारने अभ्यासाच्या नावाखाली समित्या, उपसमित्या नेमून अनेक समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मागील चार वर्षापासून केला आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करून भांडण लावणाऱ्या भाजपला धनगर समाज निश्चित जागा दाखवेल. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या सरकारने केले आहे. मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, खासदार डॉ. विकास महात्मे यांनाही धनगर बांधवांच्या प्रश्नाच देणेघेणे राहिले नाही. त्यांनाही समाज जाब विचारेल. २२ मेच्या ढोल गर्जना आंदोलनातून धनगर समाजाची ताकद व संस्कृतीचे दर्शन सरकारला करून दिली जाईल, असे शेंडगे म्हणाले.

विद्यापीठ नामांतराचे राजकारण

लिंगायत व धनगर हे समाज बांधव आहेत. मे २०१३ मध्ये काढलेल्या मोर्चात विद्यमान पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधिंचा पाठिंबा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारंवार सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव दिले जाईल, अशा घोषणा केल्या.

परंतु अद्यापही त्याबाबत काही ठोस निर्णय झालेला नाही. आरक्षण, विद्यापीठ नामांतर यावरून भाजपने अर्थात मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची ऐतिहासिक फसवणूक केली, असा आरोप शेंडगे यांनी केला.

Web Title: Give Reservation or go home says Former MLA Prakash Shendge