आम्हाला घर द्या, आम्हाला शिक्षण द्या...

शांताराम पाटील
Wednesday, 10 February 2021

पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करून विविध मागण्यांसाठी इस्लामपुरात दलित महासंघाच्या पारधी हक्क अभियानामार्फत प्रा. मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर उघडा मोर्चा काढून राहुटी आंदोलनाला सुरवात करण्यात आली. 

इस्लामपूर : पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करून विविध मागण्यांसाठी इस्लामपुरात दलित महासंघाच्या पारधी हक्क अभियानामार्फत प्रा. मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर उघडा मोर्चा काढून राहुटी आंदोलनाला सुरवात करण्यात आली. 

आज दुपारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. आम्हाला घर द्या, आम्हाला शिक्षण द्या, आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा, अशी घोषणाबाजी करत शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाकडे गेला. प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पारधी समाजाच्या योजनांची जिल्हा व तालुका पातळीवर ठोस अंमलबजावणी करावी.

 पारधी समाजातील घरकुळांचा प्रश्न तत्काळ सोडवावा. पारधी समाजाला नाहक त्रास देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, ज्या पारधी लोकांना अजून गाव मिळालेले नाही त्यांना गाव देऊन संबंधितांना तसे आदेश द्यावेत, खास बाब म्हणून दलित महासंघाच्या आदिवासी पारधी पुनर्वसन संस्थेला पारधी मुलांसाठी निवासी आश्रमशाळा मंजूर करावी. या मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी पारधी समाजातील बहुसंख्य महिला, मुलांसह पारधी कुटुंब मोर्चात सहभागी झाले होते. उत्तम मोहिते, आनंदराव थोरात, सुधाकर वायदंडे, संभाजी मस्के, दिनकर नांगरे, भारती शिंदे, नारायण वायदंडे, जितेंद्र काळे, टारझन पवार, निर्मला पवार, कारकून पवार, शेठ पवार, मालन पवार, रोशन पवार यांनी मोर्चाचे संयोजन केले.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give us a home, give us an education ...