काय बी करा पण पाणी द्या; दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची मागणी

काय बी करा पण पाणी द्या; दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची मागणी

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापुर) : आम्ही काम बघावं की, लेकर बघावं. रोज उठून आमच्या आयुष्याला हिच चाललंय. पहाटे तीन-चार ला उठून नंबरला भांडी ठेवूनही नंबर तर मिळत नाही पण भांडण होतयात सारखी. या पाण्यामुळे आणपाणी कवा कराव व लेकराला कवा घालाव. पाणी बघावं तर काम बुडतय व काम बघावं तर पाणी मिळत नाय. आम्हा बाया-माणसाला लगडंत लुगडत गुडघ्याला चालता येत नाही. तसच सायकलवरून पाणी नेताना माणस हसतीती. बाया पाणी कशी नेत्यात्या म्हणुन... पाण्यासाठी पोटावर बीब वगैरे बडवुन काम करावी का आता आम्ही? काय करायचं नेमके आम्ही? काय बी करा पण आमची पाण्याची व्यवस्था करा, अशी व्यथा दुष्काळाने होरपळत असलेल्या अंजनगाव खेलोबा येथील सजनबाई नाईकनवरे यांनी 'सकाळ' शी बोलताना मांडली. 

अंजनगाव खेलोबो हे माढा-मोहोळ रस्त्यावरील गाव. साधारण ५ हजारच्या आसपास गावची लोकसंख्या. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अंजनगाव खेलोबो या गावात तर बारामही पाण्याची टंचाई भासते. सध्याच्या परिस्थितीला येथील भयानक व दयनीय अवस्था आहे. गावातील महिला, वयस्कर व्यक्ती, लहानमुलांसह सर्वांनच पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे.

शासनाचे वतीने पाण्याच्या टँकरचे दिवसाला गावात दोन व वस्तीवर दोन अशाप्रकारे वाटप केले जाते. परंतु या टॅंकरने देखील या गावची पाण्याची समस्या संपलेली नाही. पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने टॅकरच्या भरवश्यावर सर्वांना अवलंबून रहावे लागत आहे. रोज गुण्यागोविंदाने शेजाऱ्यापाजाऱ्यांशी बोलणारे या पाण्याच्या नादात नळावर पाणी भरण्यासाठी भांडणे होऊन दुरावा निर्माण होत आहे. लहान मुलांची सुट्टी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी भरण्यात जात आहे. 

पाण्याच्या नादात धड कामालाही जाता येत नसल्याने नागरिक प्रचंड तणावमध्ये आहेत. नागरिकांबरोबर जनावरांचेही पाण्याविणा हाल सुरू आहेत. नागरिकांना रात्री ३ वाजल्यापासून पाण्यासाठी नळावर नंबरला जाऊन थांबावे लागते. व दिवसभर रात्री १२ वाजेपर्यंत अशीच पाण्यासाठी वर्दळ या गावात पहायला मिळत आहे. काही दिवसांवर गावची यात्रा आली असून पाहुणेमंडळी जत्रेला आल्यावर पाण्याचे काय असा मोठा प्रश्न देखील येथील नागरिकांना पडला आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या या गावात शासनाने अजुन टँकर वाढावावेत, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

- सिना-माढा उपसा सिंचन योजनेपासुन वंचित का?
- सिना-माढा उपसा सिंचन योजनेत उपळाई बुद्रूक पंचायत समिती गणातील अंजनगाव खेलोबो वगळता सर्व गावांचा समावेश आहे. परंतु या गावाला वगळुन का अन्याय केला जात आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भविष्यात तरी या गावची दुष्काळाची दाहकता मिटवयाची असेल तर या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com