प्राणी पाळा; पण काळजी घ्या!

प्राणी पाळा; पण काळजी घ्या!

सातारा -  पाळीव प्राणी पाळताय? सावधान! त्यापासून तुम्हाला प्राणघातक आजार होऊ शकतो. त्यामुळे घरात प्राणी पाळत असला तर योग्य काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. प्राण्यांची नियमित स्वच्छता आणि लसीकरण या माध्यमातून पाळीव प्राण्यांकडून मानवाला होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. कुत्रा, मांजर पाळण्याकडे कल असणाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याचीही संवेदनशीलतेने काळजी घेतली पाहिजे. 

वेगवेगळे प्राणी पाळण्याची आवड अनेकांना असते. सध्या ती आवड वाढू लागली आहे. ही आवड जोपासताना त्या पाळीव प्राण्यांचे आणि स्वतःसह कुटुंबातील सर्वांचे आरोग्य सुदृढ राहील, याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. रेबीज हा प्राण्यांकडून मानवाला होणारा सर्वांत घातक रोग आहे. त्याचा संसर्ग माणसांना झाला तर त्यावर कोणताही उपाय नाही. 

त्यामुळे पाळीव प्राणी पाळताना त्यांची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे. रेबिजला प्रतिबंध करण्यासाठी लहान कुत्र्याला तीन महिन्यांपूर्वी रेबिजचे इंजेक्‍शन द्यावे आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी नियमितपणे हे इंजेक्‍शन दिले पाहिजे. कुत्र्यांपासून मानवाला जंत होण्याची भीती असते. यासाठी कुत्र्याला दर तीन महिन्यांनी जंताचे औषध दिले पाहिजे आणि त्या घरातील माणसांनी वर्षातून एकदा औषध घेणे गरजेचे आहे. 

मांजरावरील पिसवा चावल्याने त्वचेवर ॲलर्जी होण्याची शक्‍यता असते. तसेच जनावराच्या गर्भपातावेळी वार काढताना संसर्ग झाल्यास संबंधित महिला, महिला डॉक्‍टरांचा गर्भपात होऊ शकतो. ब्रूसेलोसिस हा भयावह रोग असून, त्यातून सांधेदुखीचा त्रासही सुरू होतो. याशिवाय, बर्ड फ्लू, निपाह, काळीपुळी यांसारखे धोकादायक आजारही होत असतात. काळीपुळीमध्ये जनावरांच्या नाकातोंडातून रक्‍त बाहेर येत असते. त्याचा संसर्ग माणसाला झाला, तर त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्‍क आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.

जनावरांना हाताळताय..?
माणसात ‘प्राणिजन्य’ रोगाची लागण रोगग्रस्त जनावरांच्या संपर्कात आल्याने, प्राणिजन्य दूषित पदार्थांच्या सेवनाने किंवा हवेमार्फत होते. दूषित दुधाचे सेवन केल्याने दूषित दुधापासून बनवलेल्या चीजच्या सेवनानेसुद्धा रोगाची लागण माणसात होऊ शकते. पशुपालक, पशुवैद्यक, खाटीक, जनावरांच्या चामड्याचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये हे रोग आढळतात. जनावरे हाताळल्यानंतर किंवा नवजात गर्भास हाताळल्यानंतर हात निर्जंतुक करावेत. रोगी जनावरांच्या संपर्कात जाण्यासाठी तोंडावर स्वच्छ कापड अथवा मास्क व हातात मोजे व डोळ्यांवर चष्मा घालावा. खाटीक व चामडे उद्योजकांनी आपल्या अंगावर जखम असल्यास शक्‍यतो काम टाळावे व काम करताना हात व तोंडावर आवरण घालावे. जनावरांच्या संपर्कात काम करताना शक्‍यतो धूम्रपान, डोळे चोळणे, थुंकणे आदी टाळावे असे सल्ले पशुवैद्यकीय तज्ज्ञ देत असतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com