"डिजिधन'साठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कोल्हापूर - "गो कॅशलेस, गो डिजिटल' हे धोरण केंद्र शासनाने स्वीकारले असून त्यानुसार कॅशलेस म्हणजेच रोखरहित समाज ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्या दृष्टीने कॅशलेस व्यवहार कसे करायचे, याची माहिती ग्राहकांना मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी कोल्हापुरात 19 मार्च रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मेरीवेदर ग्राउंडवर डिजिधन मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

हा मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग घेऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. डिजिधन मेळाव्याच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

ग्राहकांना कॅशलेस व्यवहाराची सखोल माहिती व्हावी व व्यवहार करताना सुलभता यावी, यासाठी मेळाव्याचे आयोजन केले असून मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नागरी विकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित राहणार असल्याचे डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले. 

या मेळाव्याला जोडूनच मुद्रा बॅंक योजनेविषयी माहिती देण्यासाठी मेळावाही घेण्यात येणार आहे. डिजिधन मेळाव्यामध्ये विविध बॅंका, एमएसईबी, ऑइल व गॅस कंपन्या, चेंबर ऑफ कॉमर्स, विविध दूध संघ, बीएसएनएल यंत्रणा, महसूल विभाग यांच्यासह विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणांचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी झटून कामाला लागणे आवश्‍यक असून प्रत्येक बॅंकांनी सहभागी व्यापाऱ्यांची यादी तयार करावी. शासकीय यंत्रणांनी महाविद्यालये, विद्यापीठ यांच्या माध्यमातून जिंगल, स्लोगन, पोस्टर्स स्पर्धा घ्याव्यात. प्रत्येक विभागाने या मेळाव्यात आपल्या यंत्रणांकडील कॅशलेस पद्धतीने व्यवहार कसे करावेत, याबाबत माहिती द्यावी, असे डॉ. सैनी यांना सांगितले. 

या वेळी उप वनसंरक्षक विवेक शुक्‍ल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, जिल्हा अग्रणी बॅंकेचे प्रबंधक एस. जी. किणिंगे, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी, करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्यमंत्री फेलो पंकज नंदगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Web Title: go cashless go digital