कोल्हापुरातील जुना वाशीनाका ते गोव्याचा मुख्यमंत्री

कोल्हापुरातील जुना वाशीनाका ते गोव्याचा मुख्यमंत्री

कोल्हापूर - त्या काळी शिवाजी पेठेत मुलांसाठी खोली भाड्याने देण्याची पद्धत नव्हती. या परिसरात पहिल्यांदा आम्ही मुलांसाठी खोली भाड्याने दिली. गोव्याहून शिकण्यासाठी आलेले डॉ. प्रमोद सावंत इथेच राहात होते. एका खोलीत आठ जण कसे मावणार?, असा प्रश्‍न होता. अडचणी होत्या, तरीही आठजण केवळ शिकण्याच्या उद्देशाने एकत्रित राहू लागले. महिन्याला भाडे किती तर अवघे पावणेदोनशे रूपये. इथल्या खोलीत राहणारा प्रमोद गोव्याचा मुख्यमंत्री होईल?, असा कधी विचार मनात आला नव्हता. मध्यंतरी गोवा विधानसभेत अध्यक्ष झाल्यानंतर ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी घरी येऊन भेटही दिली. आता ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत याचा निश्‍चित अभिमान आहे असे बी. आर. भोसले आणि त्यांच्या पत्नी मंगला भोसले सांगत होत्या. 

पद्माराजे गार्डनजवळ भोसले कुटुंबियाचे घर आहे. प्रमोद 1989 च्या सुमारास कोल्हापुरात आले. त्याच्यासह शर्मा, कस्तुरे, सावंत. चौगुले असे सहकारी होते. गंगा एज्युकेशन सोसायटीत प्रमोद यांची डॉक्‍टर होण्याची वाटचाल सुरू झाली. स्वभावाने मनमिळावू असलेल्या प्रमोदने अभ्यासापलीकडे अन्य गोष्टीत लक्ष दिले नाही. आम्हीही कुटुंबातील सदस्यासारखा सांभाळ केला. जे जे घरात शिजेल, ते ते आम्ही मुलांनाही खाऊ घालायचे. भाडेकरू नव्हे तर ते आमच्या कुटुंबाचाच भाग होते. डॉक्‍टरच्या प्रशिक्षणाच्या काळात ते सावित्रीबाई फुले रुग्णालयातही जायचे. खोलीत जेवढे राहत होते, त्यांच्याकडे एकच सायकल होती. एखाद्याकडे पुस्तक आणायचे असेल तर सायकलीचा ते वापर करायचे. प्रमोद यांनी याच सायकलीचा त्याकाळी आधार घेतला होता. दोनच वर्षापूर्वी सायकल आम्ही देऊन टाकली. 1998 च्या सुमारास प्रमोद यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि प्रमोद गोव्याला गेले. एकदा खोली सोडली शक्‍यतो मागे वळून कुणी पाहत नाही. मात्र प्रमोद यांनी आमची आठवण कायम ठेवली. आमची दोन्ही मुले अधूनमधून प्रमोद यांच्याकडे जात होती. एकदा तर मी आमदार झालो आहे, असा निरोप आला. आमची मुले तिकडे गेली, की आमच्यासाठी मासे असलेला डबा प्रमोद आवुर्जन पाठवायचे. 

श्री. भोसले म्हणाले, मी एकदा शिडीवरून खाली पडलो. त्यावेळी पहिली औषधाची गोळी प्रमोद यांनीच दिली आणि मला घाटे डॉक्‍टरांकडे दाखल केले होते. 

राऊत यांची पानपट्टी हक्काचे ठिकाण 
रंकाळ्याच्या कट्टयावर प्रमोद आणि त्यांचे सहकारी गप्पात रंगायचे. नंतर जुना वाशीनाक्‍याजवळ सचिन राऊत यांची पानपट्टी हे हक्काचे ठिकाण, डॉ. देसाई,  मनोज निकम, वाशीनाका तरूण मंडळाचे कार्यकर्त्यासोबत प्रमोद रमत असत. मध्यंतरी प्रमोद गोवा विधानसभेचे अध्यक्ष झाले त्यावेळी मित्रमंडळी त्यांना भेटायला गेली होती. काल प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकला आणि भोसले कुटुंबियासह रंकाळ्यावरील त्यांच्या मित्र मंडळीचा आनंद द्विगुणित झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com