तीन कोटींची गोवा मेड दारू जप्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत म्हणजे नवे संकल्प, जुन्या कटू स्मृतींना निरोप; पण नवे वर्ष म्हणजे केवळ दारूचीच उलाढाल होते की काय, असे चित्र आहे. कारण उद्या (ता. 31) नव्या वर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ कितीची दारू रिचवली जाते, हा भाग वेगळा आहे. पण, गेल्या महिनाभरात राज्य उत्पादनशुल्क विभागाने 44 लाख 17 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत तीन कोटी 19 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. 

कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत म्हणजे नवे संकल्प, जुन्या कटू स्मृतींना निरोप; पण नवे वर्ष म्हणजे केवळ दारूचीच उलाढाल होते की काय, असे चित्र आहे. कारण उद्या (ता. 31) नव्या वर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ कितीची दारू रिचवली जाते, हा भाग वेगळा आहे. पण, गेल्या महिनाभरात राज्य उत्पादनशुल्क विभागाने 44 लाख 17 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत तीन कोटी 19 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. 

गोवा बनावटीची दारू म्हणजे ही दारू गोव्यातच विक्रीसाठी ग्राह्य असते. गोव्यात या दारूवर कर फार कमी असतो; पण गोव्याबाहेर दारूवर दुप्पट कर असल्याने त्याचा विक्रीच्या दरावर परिणाम होतो. त्यामुळे गोव्याहून बेकायदेशीरपणे कोल्हापुरात स्वस्त दारू आणायची आणि महाराष्ट्रात विकायची, यासाठी एक मोठे रॅकेट आहे. ही दारूची तस्करीच मानली जाते.

गोव्यापासून कोल्हापूर जिल्हा जवळ असल्याने ही यंत्रणा कार्यरत असते. 
राज्य उत्पादनशुल्क कोल्हापूर विभागाने दारूच्या या तस्करीवर गेले काही महिने सातत्याने लक्ष ठेवले होते. कारण गोव्याला सर्वांत जवळचा जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा असल्याने कोल्हापुरात दारूची उलाढाल मोठी असल्याने कोल्हापूरवर विशेष लक्ष ठेवले गेले. त्यानुसार गस्ती आणि भरारीपथके नेमण्यात आली. या पथकांनी एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत एक हजार 315 ठिकाणी कारवाई केली. 954 जणांवर गुन्हे दाखल केले. दारूची वाहतूक करणारी 324 वाहने व तब्बल तीन कोटी 19 लाख रुपयांची दारू जप्त केली. जप्त केलेली दारू तीन कोटी रुपयांची असेल तर त्याहीपेक्षा अधिक किमतीची दारू वेगवेगळ्या मार्गाने कोल्हापुरात आली असण्याची शक्‍यता आहे. 

गोवा बनावटीची दारू म्हणजे अनधिकृत किंवा पूर्णपणे बनावट दारू अशी परिस्थिती नाही. पण, गोवा बनावटीच्या दारू व्यवहारात मोठे आर्थिक गणित दडले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर गोव्यात एका ब्रॅंडची 720 मि.लि. दारूची मोठी बाटली (तुंब्या) 400 रुपयांना मिळते. तर हीच बाटली महाराष्ट्रात 800 रुपयांना मिळते. त्यामुळे काही ठराविक दारू विक्रेते किंवा दारू विकणारी एक समांतर यंत्रणा गोव्यातून दारू आणण्याच्या रॅकेटमध्ये आहे. गोव्यातून 400 रुपयांना एक बाटली आणायची व ती येथे 700 रुपयांना विकायची, असे हे नफ्याचे तंत्र आहे. त्यासाठी वाहतूक करणाऱ्या तरुणांची टोळीच पोसली जाते. ती गुन्हेगारी टोळक्‍याशी संबंधित आहे. त्यांच्याकडून ही दारू आणली जाते. विशेषतः ज्या दिवशी दारू दुकाने बंद, त्या दिवशी शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तस्करी करून आणलेली दारू विकली जाते. 

गोवा बनावटीची दारू आणणाऱ्या टोळ्यांवर आमचे लक्ष्य आहे. त्यामुळेच नऊ महिन्यांत तीन कोटी रुपयांची दारू आम्ही जप्त करू शकलो. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवली जाईल. 
- गणेश पाटील (अधीक्षक, राज्य उत्पादनशुल्क) 

कप्प्यांचे खास मिस्त्री 
गोव्याहून दारू आणण्यासाठी टेम्पो आहेत. त्यात दारूचे बॉक्‍स, बाटल्या ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे आहेत. येथील काही मिस्त्री असे कप्पे तयार करून टेम्पोत बसवून देतात. 

Web Title: goa made liquor of rupess 3 crore are seized