गडहिंग्लजला बकरी खरेदीसाठी झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

गडहिंग्लज - रविवारी (ता. 12) होणाऱ्या ग्रामदैवत काळभैरी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर बकरी बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. मागणीमुळे दुपटीने दर वाढले. भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. फळभाज्यांची आवक जेमतेम असल्याने दर वधारले आहेत. उन्हाळ्यामुळे काकडी, कलिंगडाला मागणी वाढली आहे. फळ बाजारात द्राक्षांची आवक चांगली आहे. 

गडहिंग्लज - रविवारी (ता. 12) होणाऱ्या ग्रामदैवत काळभैरी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर बकरी बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. मागणीमुळे दुपटीने दर वाढले. भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. फळभाज्यांची आवक जेमतेम असल्याने दर वधारले आहेत. उन्हाळ्यामुळे काकडी, कलिंगडाला मागणी वाढली आहे. फळ बाजारात द्राक्षांची आवक चांगली आहे. 

आठवड्यावर आलेल्या काळभैरी यात्रेमुळे बकरी खरेदी करण्यासाठी येथील बाजार समितीच्या आवारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी आठ वाजल्यापासूनच हा परिसर विक्रेते आणि ग्राहकांनी फुलून गेला होता. दहा वाजता तर या परिसरात पाय ठेवायला जागा नव्हती. यात्रेमुळे बकऱ्यांना अधिक मागणी असल्याने दर चांगला मिळेल, या आशेने ग्रामीण भागासह लगतच्या कर्नाटक सीमाभागातून मोठ्या प्रमाणात विक्रेते आले होते. 400 हून अधिक बकऱ्यांची आवक झाली होती. मागणी अधिक असल्याने दरही तेजीत होते. पाच ते वीस हजार रुपयांपर्यंत दर होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेसह दरही दुपटीने वाढले होते. दुपारपर्यंत या बाजारात गर्दी टिकून होती. 

भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. ऊस लावणीतील आवक कमी झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे भाजीपाला खरेदी-विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्याने दहा किलोमागे 50 रुपयांनी दर वाढले आहेत. किरकोळ बाजारातही किलोमागे 20 रुपयांनी दर वाढून तो 60 रुपये किलो असा झाला आहे. कोथिंबिरीचीही आवक कमी झाली आहे. 100 पेंड्यांचा घाऊक बाजारात 400 रुपये दर आहे, तर किरकोळ बाजारात पेंडीला दहा ते पंधरा रुपये ग्राहकांना मोजावे लागतात. टोमॅटोच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे. घाऊक बाजारात दहा किलोचा तीस रुपयांनी दर वाढून शंभर रुपयांवर स्थिरावला आहे. 
फळ बाजारात सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांची आवक वाढली आहे. चवीला द्राक्षे गोड असल्याने खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. 80 ते 100 रुपये किलो असा द्राक्षांचा दर आहे. कलिंगडाची आवकही वाढली आहे. 30 ते 80 रुपये असा आकारानुसार कलिंगडाचा दर आहे. संत्री, मोसंबी 60 रुपये किलो आहेत. सफरचंद 125 रुपये किलो आहेत. बोरे 20, तर डाळिंब 70 रुपये किलो आहेत. केळी 30 ते 35 रुपये डझन, तर जवारी केळी 40 ते 50 रुपये डझन आहेत. 

उन्हाच्या झळा... 
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते. त्यामुळेच भाजी मंडईत आवक कमी झाली आहे. ढबू, दोडका, कारली यांची थोडीही आवक आठवडा बाजार असूनही झालेली नाही. पालेभाज्या आणि कोथिंबिरीची जेमतेमच आवक आहे.

Web Title: goat purchase