पूरग्रस्त महिलांच्या पाठीमागे रूक्मिणीमाता उभी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सांगली जिल्ह्यामधील पूरग्रस्त गरजू महिलांसाठी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री रुक्‍मिणी मातेस अर्पण झालेल्या 5 हजार साड्या आज पाठवण्यात आल्या.

पंढरपूर : सांगली जिल्ह्यामधील पूरग्रस्त गरजू महिलांसाठी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री रुक्‍मिणी मातेस अर्पण झालेल्या 5 हजार साड्या आज पाठवण्यात आल्या. काल 20 हजार बुंदीचे लाडू पाठवण्यात आले होते. पंढरपूर येथील सुमारे 5 हजार पूरग्रस्तांना दोन्ही वेळचे जेवण पुरवण्याची भूमिका पार पाडून मंदिर समितीने मोठा दिलासा दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, इतर सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व महिला सदस्या शकुंतला नडगिरे, ऍड माधवी निगडे व साधना भोसले यांनी हा निर्णय घेतला. 

पंढरपूर येथे पूरपरिस्थिती निर्माण होताच त्यांनी मंदिर समितीच्या परवानगीने पूरग्रस्तांना दोन्ही वेळचे जेवण पुरवण्याचा निर्णय घेऊन विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यवाही केली. सांगली येथील पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी काल 10 हजार बुंदीचे लाडू सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोच करण्यात आले. 

5 हजार यापैकी चार हजार साड्या सांगली येथे रवाना करण्यात आल्या. उर्वरित एक हजार साड्या पुढील दोन-तीन दिवसात सांगलीला पाठविण्यात येणार आहेत. मंदिर समितीने पंढरपूर येथील पूरग्रस्तांसाठी केलेली जेवणाची उत्तम व्यवस्था, सांगली येथील पूरग्रस्तांना बुंदीचे लाडू आणि तेथील महिलांसाठी साड्या पाठवण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यवाही केल्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विठ्ठलच धावून आला अशी भावना व्यक्त होत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Godess Rukhmini sarees will distributes to flood victim